

दत्तवाड : पुढारी वृत्तसेवा
दत्तवाड तालुका शिरोळ येथील दूधगंगा नदीचे महापुराचे पाणी गेल्या 24 तासात सहा इंचाने उतरले आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. मात्र दत्तवाडसह परिसरातील दूधगंगा नदी काठावरील घोसरवाड नवे व जुने दानवाड तसेच नदीच्या दुसऱ्या बाजूकडील कर्नाटकातील बोरगाव, सदलगा, मलिकवाड, एकसंबा आदी भागातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखालीच असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसणार आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तसेच अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. तरीही दूधगंगा नदीचे पाणी संत गतीने वाढत होते. मात्र गेल्या 24 तासात दूध गंगेचे पाणी सहा इंचाने कमी झाले आहे. दूधगंगा नदीला कर्नाटकातील कुन्नूर येथे वेदगंगा नदीचे पाणी येऊन मिळते. त्यामुळे तेथून दूधगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढत जाते. मात्र वेदगंगेचे पुराचे पाणी गेल्या तीन दिवसांपासून संत गतीने कमी होत आहे. याचा परिणाम दूधगंगेच्या नदीवर होत असून, दूधंगेचे पाणीही संथ गतीने कमी होत आहे.
मात्र गेल्या आठ दिवसांपासून नदीकाठची शेकडो हेक्टर ऊस, सोयाबीन, भुईमूग आधी पिके पाण्याखालीच असल्याने ही पिके पूर्णपणे वाया जाणार आहेत. तसेच गवताची कुरणे ही गेले दहा ते बारा दिवसांपासून पाण्याखाली असल्याने पाणी ओसरले तरीही हे गवत जनावरांना खाण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत चाऱ्याची असणारी टंचाई ही पाणी ओसरल्यानंतरही शेतकरी व पशुपालकांना भेडसावणार आहे. तसेच आणखीन थोडे पाणी वाढले असते तर दत्तवाड येथील अनेक कुटुंबांना स्थलांतर व्हावे लागणार होते. मात्र या कुटुंबांना नदीचे पाणी थोडे ओसरल्याने मोठा दिलासा मिळालेला आहे.
मात्र धरण क्षेत्रात पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने राधानगरी, दूधगंगा तसेच कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढला आहे. त्याचा परिणाम होऊन दूधगंगा, पंचगंगा व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत किती वाढ होईल हे पुढील 24 तासात कळणार आहे.