

कोल्हापूर : जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या पावसाने घरे, दुकाने, टपर्यांचेही मोठे नुकसान झाले होते. त्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, वर्ष उजाडले तरीही ही मदत अद्याप पूरग्रस्तांच्या हाती पडलेली नाही.
जिल्ह्यात गतवर्षी जून ते ऑगस्ट या कालावधीत घरांची पडझड मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यासह दुकाने, टपर्यांचेही नुकसान झाले होते. जिल्ह्यातील या नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाला अहवाल सादर केला होता. त्यानुसार पात्र ठरवण्यात आलेल्यांचे एकूण 10 कोटी 7 लाख 65 हजार रुपयांचे नुकसान निश्चित करण्यात आले.
राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना एसडीआरएफच्या निकषानुसार तत्काळ मदत केली जाते. त्यानुसार या नुकसानग्रस्त नागरिक, दुकानदार, टपरीचालकांना गतवर्षीच मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता एक वर्ष होत आल्याने त्यांची तत्काळ मदतीची अपेक्षाच फोल ठरली आहे. जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याने गतवर्षीच्या मदतीची रक्कम यावर्षी मंजूर झाली. त्याबाबतचा शासन आदेश 12 जून 2025 रोजी काढला. मात्र, शासन आदेश काढूनही आत जवळपास दोन महिने उलटत आले आहेत, तरीही या आदेशानुसार मंजूर रक्कम संबंधितांच्या खात्यावर वर्ग झालेली नाही.
गतवर्षी घर पडझड, दुकाने, टपर्यांचे सर्वाधिक नुकसान करवीर तालुक्यात झाले होते. जिल्ह्यात एकूण 1 हजार 876 दुकानांचे 6 कोटी 98 लाख 9 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यापैकी एकट्या करवीर तालुक्यातील 1 हजार 333 दुकानांचे 4 कोटी 45 लाख 23 हजारांचे नुकसान झाले आहे.