kolhapur flood line | कोल्हापूरकरांच्या गळ्याला पूररेषांचा फास!

जलसंपदा विभागाच्या गलथान कारभाराचा परिणाम; पूररेषा नव्याने निश्चित करण्याची आवश्यकता
kolhapur flood line |
kolhapur flood line | कोल्हापूरकरांच्या गळ्याला पूररेषांचा फास!
Published on
Updated on

सुनील कदम

कोल्हापूर : जलसंपदा विभागाने 2021 साली कोल्हापूर शहरासाठी निश्चित केलेली पूररेषा (रेड लाईन) आणि पूर नियंत्रण रेषा (ब्ल्यू लाईन) शहराच्या विकासाला कोलदांडा घालणारी आहे. त्यामुळे या दोन्ही पूररेषा नव्याने निश्चित करण्याची आवश्यकता आहे.

जुन्या पूररेषा!

कोल्हापूर शहराचा दुसरा सुधारित विकास आराखडा 1999 साली मंजूर करण्यात आला आहे. हा विकास आराखडा मंजूर करताना जलसंपदा खात्याने महापालिकेला ढोबळमानाने पूररेषा आणि पूर नियंत्रण रेषा आखून दिलेली होती. या दोन रेषांच्या मधले क्षेत्र हे बांधकाम निषिद्ध क्षेत्र समजण्यात येते. त्यामुळे महापालिकेने आजपर्यंत बांधकाम परवाने देताना पाटबंधारे खात्याने निश्चित केलेले बांधकाम निषिद्ध क्षेत्र वगळूनच बांधकाम परवाने दिलेले आहेत. असे असताना जलसंपदा विभागाने 2021 साली नवीन पूररेषा आणि पूर नियंत्रण रेषा आखून दिलेली आहे; पण या पूररेषांमुळे जवळपास निम्मे कोल्हापूर पूरपट्ट्यात लोटले गेले आहे. शेकडो वर्षांपासून वसलेल्या नागरी वस्त्या पूररेषा आणि पूर नियंत्रण रेषेवर ढकलल्या गेल्या आहेत.

जुन्या पूररेषांमध्ये बदल!

जलसंपदा विभागाच्या वतीने महापालिकेला 14 जानेवारी 2019 रोजी एक निवेदन पाठविण्यात आले होते. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘जलसंपदा खात्याने यापूर्वी 1984, 1989 आणि 2005 साली आलेल्या पूरस्थितीचा लाल, निळ्या व हिरव्या रंगांनी पाणी पातळी दर्शविणारा चिन्हांकित नकाशा महापालिकेला दिलेला आहे. परंतु, या रेषा प्रत्यक्षात पूररेषा व पूर नियंत्रण रेषा नाहीत. त्यासाठी कोणताही तांत्रिक किंवा शास्त्रीय अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवीन बांधकाम परवाने देताना पूर पातळी रेषेबाबत पाटबंधारे खाते निश्चित करेल. त्याच्या अधीन राहण्याचे बंधन संबंधितांवर घालण्यात यावे.’

नागरी वस्त्यांना धोका!

जलसंपदा विभागाने 2021 साली निश्चित केलेली पूररेषा आणि पूर नियंत्रण रेषा जवळपास दीडशे मीटरने आत सरकवण्यात आली आहे. साधारणत: शिये फाट्यावरून बावडामार्गे कोल्हापुरात येऊन शिवाजी पुलावरून रत्नागिरीकडे जाणार्‍या रस्त्याला कमी-अधिक अंतरावरून या रेषा स्पर्श करतात. त्याचप्रमाणे तावडे हॉटेलमार्गे कोल्हापुरात येणार्‍या रस्त्याला नवीन टोल नाक्यापर्यंत या रेषा बाधित करतात. जलसंपदा खात्याने नव्याने निश्चित केलेल्या या क्षेत्रात साधारणपणे खानविलकर पेट्रोल पंप आणि प्रभू हॉस्पिटलसह पाठीमागचा परिसर, महावीर कॉलेजच्या पिछाडीचा सगळा परिसर, न्यू पॅलेससह त्याच्या मागचा परिसर, नवीन न्यायालय आणि पोलिस मुख्यालयामागचा परिसर, कसबा बावडा गावाचे जवळपास एकतृतीयांश क्षेत्र, राजाराम सहकारी साखर कारखान्याचा संपूर्ण परिसर, शासकीय विश्रामगृहाच्या पूर्वेकडील भाग, कदमवाडीचा काही भाग आणि तावडे हॉटेल व टोल नाक्याच्या उत्तरेकडील भाग येतो.

बांधकामे धोक्यात!

पूर्वीच्या विकास आराखड्यानुसार हा बहुतांश भाग रहिवास विभागामध्ये येतो. मात्र, 2021 सालच्या नवीन ब्ल्यू लाईनमुळे हा सगळा परिसर बांधकाम निषिद्ध क्षेत्रात समाविष्ट झालेला आहे. विकास आराखड्यानुसार महापालिकेने या भागात हजारो नवीन बांधकाम परवाने दिले आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेने रस्ते-क्रीडांगणासह काही नागरी सुविधा विकसित केल्या आहेत. त्यामुळे 2021 साली निश्चित केलेली पूररेषा आणि पूर नियंत्रण रेषा तातडीने रद्द करण्याची आवश्यकता आहे.

रेड लाईन म्हणजे काय?

ज्या भागात धरण नसेल त्या भागात सरासरी 100 वर्षांतून एकदा नदीपात्रातून येणारा पाण्याचा विसर्ग नदीच्या दोन्ही तीरांवरील ज्या भूभागाला बाधित करतो, तिथपर्यंतचा भाग हा रेड लाईन समजण्यात येतो. रेड लाईन झोनमध्ये नागरिकांना पुराचा फटका बसल्याची उदाहरणे राज्यात फार कमी संख्येने आढळून येतात.

ब्ल्यू लाईन म्हणजे काय?

साधारणत:, 25 वर्षांतून एकदा धरणातील सांडव्यासह अन्य मार्गाने पूर्ण क्षमतेने नदीपात्रात येणारा पाण्याचा विसर्ग नदीच्या दोन्ही तीरांवरील ज्या भूभागाला बाधित करतो किंवा नेहमीपेक्षा दीडपट क्षमतेने नदीपात्रातून वाहणारे पाणी ज्या भूभागाला बाधित करते, तिथपर्यंतचा भाग हा ब्ल्यू लाईन समजण्यात येतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news