

पन्हाळा\करंजफेण : पेंडाखळे वनपरिक्षेत्रातील मौजे करंजफेण येथे सापळा रचून खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करणाऱ्या पाच जणांना वन विभागाने सुमारे पाच किलो मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. शनिवारी (दि. २१) ही कारवाई करण्यात आली. संशयितांना कळे-खेरिवडे (ता. पन्हाळा) येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन्यजीव तस्करीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पेंडाखळे वनपरिक्षेत्रात खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती शनिवारी (दि. २१) वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागाच्या विविध पथकांनी करंजफेण येथे सापळा रचला. यावेळी खवल्यांची विक्री करण्याच्या तयारीत असताना लहू धाकू हडकर (वय ६०, रा. सावडाव डोंगरेवाडी, ता. कणकवली), ज्ञानदेव सत्तू सावरे (४६, रा. घुंगूर), प्रकाश शंकर पाटील (५०, रा. पाल), बाजीराव बंडोपंत माळवी (३८, रा. मरळे) आणि नाथाजी यशवंत पाटील (३९, रा. पाल, ता. शाहूवाडी) या पाच जणांना वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे पाच किलो खवले जप्त करण्यात आले.
ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक प्रियांका दळवी, मानद वन्यजीव रक्षक यशपाल सुतार, कोल्हापूर फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, करवीरचे नंदकुमार नलवडे, पन्हाळ्याचे अजित माळी, पेंडाखळ्याचे किशोर आहेर, वनपाल मधुकर जासूद, दिलीप आरेकर यांच्यासह वनरक्षक, वनमजूर आणि आरआरटी पथकाने संयुक्तपणे केली.