

कोल्हापूर : सराईत गुंड कुमार गायकवाडच्या खुनाचा बदला घेण्यासाठी जामिनावर बाहेर आलेल्या सराईत गुंडावर गवळी गँगने जीवघेणा हल्ला केला. तलवार, एडका, दगडाने केलेल्या हल्ल्यात रवी गोविंद कांबळे (वय २९, रा. कनाननगर) जखमी झाला. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास राजेंद्रनगर येथील लोखंडे वखार परिसरात हा प्रकार घडला.
या प्रकरणी कुमार गायकवाडचा मामा त्र्यंबक वसंत गवळी, श्रीमंत गवळी, अमित गवळी, सुमित गवळी, सलीम शेख, सोन्या जगदाळे, कार्तिक बल्लाळ, शुभम ऊर्फ अक्षय मुळे, सचिन कांबळे ऊर्फ टिंग्या यांच्यावर गुन्हा दाखल केला. रविवारी रात्री उशिरा श्रीमंत वसंत गवळी (वय ३७), सचिन मुकुंद कांबळे (३०) यांना अटक केली.
वर्चस्ववादातून गुंड कुमारचा नोव्हेंबर २०२२ मध्ये टेंबलाई उड्डाणपूल परिसरात निर्घृण खून केला होता. या प्रकरणी मुख्य संशयित अमर माने, आकाश घस्ते, रवी कांबळे, यश पोतदार, आदर्श शेंडेकर यांना अटक झाली. सध्या सर्व संशयित जामिनावर आहेत. शनिवारी रात्री आठच्या सुमारास रवी कांबळे राजेंद्रनगरातील स्वप्निल ढाकरेकडे जेवण्यासाठी आला होता. याचवेळी त्र्यंबक गवळीसह आठ ते नऊ जणांनी हातात तलवारी, एडका घेऊन रवी कांबळेवर हल्ला केला. त्र्यंबकने तलवारीने रवी कांबळेच्या डोक्यात वार केला. तर श्रीमंतसह अन्य संशयितांनी एडका, काठीने त्याच्यावर हल्ला चढवला.
दगडफेकीने तणाव
गवळी गँगने घरांवर केलेल्या दगडफेकीमुळे रहिवाशांमध्येही धावपळ सुरू झाली. नंग्या तलवारी, एडके नाचवत परिसरात दहशत माजवली. घाबरलेल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक विकास जाधव पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संशयितांची धरपकड सुरू केली. गवळी व जोकर गँगमधील वाद शनिवारी रात्री पुन्हा उफाळला. जखमी रवी कांबळेवर ५ गुन्हे असून, संशयित त्र्यंबक, श्रीमंतवरही ६ गुन्हे दाखल आहेत. अन्य संशयितांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत.