Farmers Protest | शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; महामार्ग ३१ तासांनंतर खुला

आता कारखान्यांना घेराव : राजू शेट्टी
Farmers Protest |
कोगनोळी : शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना राजू शेट्टी.
Published on: 
Updated on: 

कोगनोळी : तब्बल ३१ तास सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन बुधवारी सायंकाळी स्थगित करण्यात आले. सामान्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी हे आंदोलन स्थगित करून आता साखर कारखान्यांना घेराव घालण्यात येईल, अशी घोषणा माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता शेतकऱ्यांनी टोल नाक्यांवरील ठिय्या आंदोलन मागे घेतले. यानंतर लगेच महामार्गावरील रहदारी सुरू झाली. दरम्यान, कोगनोळी नाक्यावरील शेतकरी महाराष्ट्रातील कारखान्यांच्या दिशेने निघाले, तर हत्तरगी नाक्यावरील शेतकरी हुबळीच्या दिशेने निघाले असून पुन्हा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

गुरुवारी सकाळी रेठरे येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर धडक देण्यात येईल. त्यानंतर परिसरातील कारखान्यांचे गाळप बंद करण्यासाठी आंदोलन केले जाईल, अशी घोषणा शेट्टी यांनी केली. आंदोलकांना संबोधित करताना शेट्टी म्हणाले, आंदोलनामुळे अनेकांची गैरसोय झाली. कंटेनर व अवजड वाहनधारकांना त्रास झाला. त्यांची अधिक गैरसोय टाळण्‍यासाठी आंदोलन स्थगित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने योग्य निर्णय घेतला नाही, तर पुन्हा कोगनोळीत आंदोलन करू, असेही ते म्‍हणाले.

ऊस उत्पादकांच्या समस्यांचे परीक्षण, निराकरणासाठी समिती; रमेश चंद अध्यक्ष

नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे परीक्षण आणि निराकरणासाठी सरकारने, नीती आयोगाचे माजी सदस्य प्रा. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री तसेच ग्राहक व्यवहार, अन्‍न आणि सार्वजनिक वितरणमंत्री यांच्यातील बैठकीत ठरल्यानुसार या समितीचे गठन करण्यात आले. ही समिती, ऊस लागवडीचा खर्च, मोबदला वाढीच्या मागणीची तपासणी करेल. साखर उत्पादन खर्च, साखरेला मिळणारा भाव आणि कारखान्यांची आर्थिक सुस्थिती यासंदर्भात साखरेच्या कारखाना किमान विक्री किमतीत सुधारणेच्या मागणीचीदेखील पडताळणी करेल.

logo
Pudhari News
pudhari.news