कोल्हापूर : शेतकऱ्यांनी धामणी प्रकल्पावर घेतली अधिकाऱ्यांची भेट; आंदोलनाचा दिला इशारा

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी धामणी प्रकल्पावर घेतली अधिकाऱ्यांची भेट; आंदोलनाचा दिला इशारा
Published on
Updated on

म्हासुर्ली: पुढारी वृत्तसेवा : धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी धामणी प्रकल्पस्थळी जावून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आज (दि.२७) भेट घेतली. यावेळी धामणी प्रकल्पाच्या कामाबाबत चर्चा केली. येत्या ऑक्टोबरमध्ये घळभरणीच्या कामास सुरुवात करू, असे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले. घळभरणीस विलंब झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला.

धामणी मध्यम प्रकल्प कामाला सन २००० मध्ये सुरुवात झाली होती. सुरुवातीची दोन वर्षे झपाट्याने चाललेल्या कामासमोर अडथळ्यांचे डोंगर उभे राहून दरम्यान दीर्घकाळ काम बंद राहिले होते. एकीकडे ठप्प असणारे काम तर वाढणाऱ्या पाणी टंचाईच्या दाहकतेने एकूणच धामणी खोऱ्याची होरपळ वाढत होती. वारंवार लोकांनी दिलेल्या जनरेट्यातून तर लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून गतवर्षी कामास सुरुवात होवून २०२४ ला प्रकल्पात पाणी साठवण्याचे शासनाने नियोजन ठेवले. मात्र, कामाची गती पाहता पाणी अडवण्यातील मुख्य घटक असणाऱ्या घळभरणीच्या कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी एकूणच धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांनी प्रकल्प स्थळाला भेट दिली.

अनेक दशकाची प्रतीक्षा करता करता १९९६ मध्ये ३.८५ टीएमसी साठवण क्षमतेच्या धामणी मध्यम प्रकल्पास प्रशासकीय मान्यता मिळाली. तर पुढे डिसेंबर २००० मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. दोन वर्षे कामाचा झपाटा इतका होता की अर्धे अधिक काम झाले. मात्र, प्रकल्पांतर्गत येणाऱ्या प्रश्नांनी मान वर काढण्यास सुरुवात केली. प्रकल्पासमोर अनेक अडचणींचा मोठा डोंगर उभा राहिला. वीस बावीस वर्षाचा टप्पा ओलांडला तरी प्रकल्प जैसे थे स्थितीतच राहिला.

उन्हाळ्यातील दोन महिने नदी पूर्णतः कोरडी पडत असल्याने एकूणच धामणी खोऱ्यात पाणीटंचाईचा आगडोंब उसळतो. टंचाईने पुरती हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी वारंवार मोर्चे, आंदोलनाद्वारे शासनाला आपल्या हक्काचे पाणी मिळवण्यासाठी साद घातली. तर अनेक जटील प्रश्नांची सोडवणूक करत पुन्हा नव्याने काम सुरु करण्याबाबत लोकप्रतिनिधींना ही यश मिळाले. गतवर्षी प्रकल्प कामास सुरुवात झाली. तर २०२४ मध्ये एक टीएमसी पाणीसाठा करण्याचे शासनाने नियोजन आखले. मात्र, नियोजनानुसार काम सुरु नसल्याने लोकांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कामाच्या वाटचालीबाबत शहानिशा केली. त्यावेळी त्यांनी प्रकल्प सांडव्याचे काम, माती काम, प्रकल्पग्रस्तांचेही प्रश्न सोडवण्याचे काम चालू असल्याचे सांगितले. येत्या ऑक्टोबरमध्ये घळभरणीस सुरुवात करू, असे आश्वासन दिले.

यावेळी मनोज देसाई, रामदास चौगले, विलास बोगरे, राजाराम पात्रे, दिनकर पाटील, मारुती पाटील, संभाजी पाटील, आदीसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news