

Kolhapur News
देवाळे: भोगावती नदीच्या वाढत्या पुराच्या पाण्यात बुडून कारभार वडी तालुका करवीर येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला. प्रदीप तुकाराम पाटील (वय ४९) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आज (मंगळवार) सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. करवीर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. भोगावती नदीचे पाणीही पात्राबाहेर पडले असून पाणी वाढतच आहे. या वाढत्या पुरामुळे शेतात पसरलेल्या ठिबकच्या पाईप्स वाहून जातील या भीतीमुळे प्रदीप पाटील हे पुराच्या पाण्यातून या पाईप्स बाहेर काढण्यासाठी गेले होते. वाहत्या पाण्याच्यास प्रवाहात पाईपस् काढत असतानाचा पुराच्या पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.
शेताकडे जाऊन बराच वेळ झाला तरी पाटील घरी न परतल्याने त्यांची मुले शेताकडे धाव घेतली. तेव्हा त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही शोककळा पसरली आहे. प्रदीप पाटील यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुलगी असा परिवार आहे. करवीर पोलीस अधिक तपास करत आहेत.