

कोल्हापूर : कोल्हापुरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा राजेंद्रनगरमधील देवाभाई नामक व्यक्तीने पुरविल्या असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे देवाभाईचा शोध शाहूपुरी पोलिसांकडून घेतला जात आहे. बनावट नोटा प्रकरणामध्ये सराईत टोळीचा सहभाग असल्याचा अंदाज पोलिसांचा आहे.
शहरातील स्टेशन रोडसह शाहूपुरी परिसरात पाचशे रुपयांच्या हुबेहूब बनावट नोटांची तस्करी करणाऱ्या राहुल प्रकाश किरुगडे आणि गुरू राजेंद्र मेंगाणे याला शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांना या नोटा राजेंद्रनगरमधील देवाभाईने पुरविल्या असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी देवाभाईचा शोध सुरू केला आहे. नोटा खपविण्यासाठी रोजंदारीवर काम करणाऱ्या मजदुरांचा वापर केला जात होता. किरुगडे व मेंगाणे हे केवळ नोटा खपविण्याचे काम करत होते. पुरवठादार व नोटांची छपाई कुठे झाली, याचा शोध पोलिस घेत आहेत.