

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बनावट धनादेश करून त्याद्वारे कोल्हापूर जिल्हा परिषदेला 57 कोटींचा गंडा घातला. ही बाब लक्षात येताच जि.प.च्या वित्त विभागाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे ही रक्कम जि.प.च्या खात्यावर सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद वित्त विभागाच्या वतीने एक दिवसआड बँक खात्याचा उतारा तपासला जातो. त्यानुसार शुक्रवारी (दि. 21) सायंकाळी खाते उतारा पडताळणी करताना जि.प. खाते क्र. 01 व 04 मधून 19 कोटी 2 लाख 1 हजार 542; 19 कोटी 96 लाख 8 हजार 603 तसेच 18 कोटी 4 लाख 30 हजार 641 रुपये खात्यातून वर्ग झाल्याचे म्हणजे खर्ची पडल्यास निदर्शनास आले. यापैकी 19 कोटी 2 लाख 1 हजार 542 व 19 कोटी 96 लाख 8 हजार 603 या रकमा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून व 18 कोटी 4 लाख 30 हजार 641 रुपये ही रक्कम आयडीएफसी बँक खात्यातून वर्ग झाल्या होत्या. या रकमेचे मूळ धनादेश वित्त विभागात असल्यामुळे बनावट धनादेशाद्वारे हा प्रकार करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वित्त विभागाने पुढील सूत्रे हलविण्यास सुरुवात केली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे यांनी तत्काळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अधिकार्यांशी संपर्क साधून खाते गोठवून वर्ग झालेली रक्कम जिल्हा परिषदेच्या मूळ खात्यावर जमा करण्याचे लेखी कळविल्यामुळे ही रक्कम परत जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा झाली
फोकस इंटरनॅशनल कंपनीच्या नावावर 18 कोटी 4 लाख 30 हजार 641 रुपये वर्ग झाले होते. त्याचे खाते आयडीएफसी बँकेत होते. आयडीएफसी बँकेलाही संबधिताचे खाते गोठवून जमा झालेली शासन रक्कम जि.प. खात्यास वर्ग करण्यास कळविल्यानंतर या बँकेनेदेखील संबंधिताचे बँक खाते गोठवून शासकीय रक्कम सुरक्षित असल्याचे कळविले. ज्या बनावट धनादेशाद्वारे पेमेंट झाले होते, त्याच्या छायांकित प्रतीदेखील बँकेकडून जिल्हा परिषदेच्या वतीने त्वरीत मागविण्यात आल्या होत्या. बनावट धनादेशाच्या छायांकित प्रतीची तपासणी केली असता हे धनादेश बनावट असून खोट्या सह्या मारल्याचे दिसून येते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत तसेच या घटनेच्या मुळापर्यंत जाण्यासाठी जिल्हा परिषद वित्त विभागाच्या वतीने शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली आहे. लेखाधिकारी कृष्णात पाटील यांनी ही तक्रार दिली आहे.