

कोल्हापूर : कोल्हापुरात गेल्या तीन दिवसांपासून थंडीची चाहूल लागली आहे. किमान तापमानात घट झाल्याने शहरवासीयांना गुलाबी थंडीची अनुभूती मिळत आहे. गुरुवारी दैनंदिन सरासरी किमान तापमानात किंचित घट होऊन पारा १८.२ अंश सेल्सिअसवर घसरला. गेल्या काही दिवसांपूर्वी २२ अंशांवर असलेले किमान तापमान थेट १८ अंशांपर्यंत खाली आल्याने रात्री आणि पहाटे हवेत चांगलाच गारवा जाणवत आहे. आगामी चार दिवस हा गारवा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तापमानातील घसरणीमुळे सायंकाळनंतर शहरातील वातावरणात गारठा जाणवू लागला आहे. रात्री तसेच पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक स्वेटर आणि कानटोपीचा वापर करताना दिसत आहेत. मात्र, रात्री आणि पहाटे गारवा जाणवत असला तरी दिवसा उन्हाचा तडाखा कायम आहे. गुरुवारी शहरातील कमाल तापमान ३१.४ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने दुपारच्या वेळी उकाडा जाणवत होता. त्यामुळे कोल्हापुरात सध्या रात्री गुलाबी थंडी, तर दिवसा उन्हाचा चटका असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आहे.