

इचलकरंजी : येथील एका अपार्टमेंटमध्ये वीज जोडणी देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना महावितरणचा कार्यकारी अभियंता प्रशांत ताराचंद राठी (वय 49, रा. उपकार रेसिडेन्सी सांगली रोड, इचलकरंजी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी पकडले. दरम्यान, राठी याचा रक्तदाब वाढल्याने त्याला कोल्हापूरच्या सीपीआर इस्पितळात दाखल केले आहेे. उपचारानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातीलच इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टरने एका अपार्टमेंटमधील 18 फ्लॅटमध्ये वीज जोडणीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात सादर केली होती. हा अर्ज मंजूर करण्यासाठी कार्यकारी अभियंता राठी याने 18 प्लॅटचे प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 90 हजार रुपये मागितले होते. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पडताळणीत राठीने 90 हजार रुपये लाचेच्या मागणीस दुजोरा देत तडजोडीअंती 30 हजार रुपयांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. मंगळवारी दुपारी महावितरणच्या स्टेशन रोडवरील त्याच्या कार्यालयातच राठी याला तक्रारदाराकडून 30 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. राठी याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयजीएममधील प्राथमिक उपचारानंतर त्याला रात्री सीपीआरला हलवण्यात आले.
राठी याच्या इचलकरंजीतील उपकार रेसिडेन्सीमधील फ्लॅट, तसेच अमरावती जिल्ह्यातील धामणगाव या मूळ गावी असलेल्या घरावरही छापे टाकण्यात आले.
स्टेशन रोडवरील महावितरणच्या कार्यालयातच राठी याच्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईनंतर काहीजणांनी महावितरणच्या प्रवेशद्वारातच फटाक्याची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.