कोल्हापूर ः महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी भाऊसिंगजी रोड, सीपीआर चौक परिसरातील अनधिकृत 5 हातगाड्या हटविल्या; तर 6 हातगाड्यांजवळील शेड काढण्यात आले. तसेच, राजारामपुरी मेनरोडवरील वाहतुकीस अडथळा करणारे व दुकानाबाहेर लावण्यात आलेले 23 अनधिकृत स्टँडी बोर्ड जप्त केले. भगवा चौक ते पिंजार गल्ली मेनरोडवरील 9 डिजिटल बोर्डवरही कारवाई करून ते जप्त करण्यात आले. ‘भाऊसिंगजी रोडला अतिक्रमणांचा विळखा’ या मथळ्याखाली ‘पुढारी’ने वृत्त प्रसिद्ध केले होते, या वृत्ताची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.
कोल्हापूर शहरातील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर अतिक्रमणे वाढली आहेत. या अतिक्रमणांचा अडथळा वाहतुकीला होत आहे. त्यामुळे ही अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वर्दळीने नेहमी गजबजलेल्या भाऊसिंगजी रोडलाच अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंगळवारी ही कारवाई केली.