कोल्हापूर : सरकारने 43 इंच आणि त्यावरील एलईडी टीव्ही तसेच एअर कंडिशनरवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केल्याने शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. या कपातीमुळे ग्राहकांचा मोठा फायदा होत असून, वस्तूंच्या किमतीत लक्षणीय घट झाल्याने विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विक्रेत्यांच्या मते, या दसर्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 ते 25 टक्के अधिक विक्री होण्याची शक्यता आहे.
जीएसटी कमी झाल्यामुळे ग्राहकांना एका वस्तूवर 4,000 ते 5,000 रुपयांपर्यंतची बचत होत आहे. यामुळे अनेक ग्राहक आता एसी, स्मार्ट टीव्ही आणि डिशवॉशरसारख्या वस्तू खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
जीएसटी कमी झाल्याचा फायदा घेण्यासाठी अनेकजण आधीच शोरूममध्ये गर्दी करत आहेत. कंपन्यांनीही सणांच्या दिवसांसाठी आकर्षक ऑफर्स आणि फायनान्स योजना जाहीर केल्या आहेत. यामुळे एलईडी टीव्हीची मागणी विशेषतः वाढली असून, यंदा एलईडी टीव्हीच्या विक्रीत मोठा टर्नओव्हर होण्याची शक्यता आहे. बाजारात 10 टक्क्यांपर्यंतच्या सवलती मिळत असल्याने ग्राहकांमध्ये उत्साह आहे. दसर्याला मोठी उलाढाल अपेक्षित आहे.