

दोनवडे : कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे पादचारी वृद्ध महिलेला मिक्सर ट्रकचालकाने चाकाखाली चिरडल्याने तिचा जागीच अंत झाला. मुगाबाई शंकर निगडे (वय 75) असे तिचे नाव आहे. गुरुवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
नागदेववाडी (ता. करवीर) येथील मुगाबाई या आपल्या सुनेसह दुपारी पावणेबाराच्या सुमारास चालत बालिंगा येथे बँकेत निघाल्या होत्या. त्याच दरम्यान बालिंगा येथे मागून भरधाव वेगाने आलेल्या मिक्सर ट्रकची जोरदार ठोकर बसल्याने मुगाबाई जागीच कोसळल्या आणि त्यांच्या अंगावरून ट्रक गेला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. डोळ्यांदेखत आपल्या सासूचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे पाहून सुनेलाही धक्का बसला. अपघातामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली. मुगाबाई यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.