कोल्हापूर: वृद्ध लोक कलाकार मानधनापासून वंचित

कोल्हापूर: वृद्ध लोक कलाकार मानधनापासून वंचित


हुपरी :  गावात आपली कला सादर करुन गावातील लोकांचे मनोरंजन , देव देवतांची सेवा करणाऱ्या लोक कलावंताना वृध्दापकाळात आपल्या कुटुंबाचा निर्वाह करताना तारेवरची कसरत करावी लागते. या कलावंताना मानधन देण्याच्या घोषणा झाल्या समित्या नेमल्या, पण  शेकडो लोक कलावंताना अद्याप शासनाचे मानधन मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासन वृद्ध साहित्यिक व लोक कलाकारांना मानधन योजना संपूर्ण महाराष्ट्रभर राबविते. त्यामुळे वृद्धांना शासनाकडून मोठा हातभार लागत असतो. मात्र, आज अनेक कलाकार असे आहेत की, त्यांना अजून मानधन सुरू नाही, प्रत्येक वर्षी प्रस्ताव दिला जातो, पण काही तरी त्रुटी दाखवून फेटाळले जातात. त्यामुळे  या  योजनेत खऱ्या कलाकाराला मानधन मिळते का ? हा प्रश्न असून ग्रामीण भागातील अनेक लोक कलाकारांमध्ये संतापाची भावना आहे.

ग्रामीण भागातील विविध क्षेत्रात आपली कला सादर करणाऱ्या लोक कलाकरांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनाने त्यांना अनुदान योजना सुरू केली आहे. योजना चांगली आहे. मात्र, या योजनेचे प्रस्ताव धूळखात पडतात. किंवा त्यात त्रुटी काढून फेटाळले जातात. त्यामुळे योजनाच जाहीर का करता असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या कलाकारांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

निवड समितीत लोक कलाकार असला पाहिजे. तसेच ज्या वृद्ध कलाकारांचे प्रस्ताव आले आहेत. त्यांची कागदपत्रे तपासून त्या कलाकारांची चाचणी (त्याच्या कलेचे सादरीकरण ) घेऊनच त्यांची निवड करावी. जेणेकरून वशिलेबाजीला आळा बसेल, अशी मागणी लोक कलाकार सुदर्शन खाडे यांनी केली आहे.

हातकणंगलेला प्रतिनिधीत्व नाही

हातकणंगले तालुक्यात विविध प्रकारच्या लोक कलावंताची संख्या जास्त आहे. मात्र, सध्या असणाऱ्या निवड समितीमध्ये या तालुक्याला एक जागा असतानाही ती भरली नाही. तालुक्यातील लोक कलावंतावर अन्याय आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून कलाकारांना न्याय देण्याची गरज आहे.

– सुदर्शन खाडे, हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई मातेचे गोंधळी

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news