

कोल्हापूर : उंच कडे, खोल दर्या व त्यांना जोडणारे झुलते पूल, प्रचंड वेगाने वाहणारे वारे, रक्त गोठविणारी थंडी आणि क्षणार्धात बदलणारे वातावरण अशा प्रतिकूल परिस्थितीत आत्मविश्वासाच्या जोरावर कोल्हापुरातील देसाई पती-पत्नी या ज्येष्ठ दाम्पत्याने हिमालयातील एव्हरेस्ट बेस कॅम्प (उंची 17 हजार 598 फूट) व काला पत्थर (उंची 18519 फूट) ही मोहीम फत्ते केली.
देवकर पाणंदमधील गृहिणी सौ. निताली (वय 56) व पती अनिल देसाई (वय 65, सेवानिवृत्त सेंट्रल जीएसटी अधिकारी) यांनी हिमालयातील अत्यंत अवघड अशी ही मोहीम यशस्वी केली. घर-संसार, मुले जबाबदार्या पार पाडल्यानंतर स्वतःसाठी काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार करून 2024 मध्ये देसाई दाम्पत्याने मोहिमेची तयारी सुरू केली. अनिल देसाई यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक 2008 मध्ये यशस्वीरीरत्या पूर्ण केला होता. फ्रेंडशिप पिक आईस एक्सपिडिशनसह हिमालयातील छोटे मोठे ट्रेक केले होते. नियमित जिम, मैदानी व्यायाम, योगा, गिर्यारोहण, आहार आणि मानसिक तयारी केली. प्रत्येक रविवारी कुशिरे ते जोतिबा डोंगर चढणे, उतरणेसह हिमालयातील महर की धून हा ट्रेकही यशस्वीरीत्या पूर्ण केला.