

कोल्हापूर : देशात येत्या एप्रिल महिन्यापासून आठवी आर्थिक गणना सुरू होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू झाली आहे. हे काम वेळेत आणि योग्य पद्धतीने व्हावे, याकरिता राज्यासह जिल्हा, तालुका आणि महापालिका क्षेत्रावर समिती स्थापन करण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या वतीने दर पाच वर्षांनी आर्थिक गणना केली जाते. यावर्षी ही आठवी गणना होणार असून, तिचे काम एप्रिल 2025 ते मार्च 2026 पर्यंत चालणार आहे. जनगणनेसारखेच आर्थिक गणनेचे काम केले जाणार आहे. यामुळे घरोघरी भेट देऊन प्रगणक नागरिकांच्या उत्पन्नांच्या स्रोतांची माहिती घेणार आहेत. त्याद्वारे उद्योग, व्यवसाय तसेच सेवा क्षेत्र आदींत सहभागी असलेल्या कुटुंबांतील सर्व सदस्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.
ही आर्थिक गणना योग्य पद्धतीने व्हावी, वेळेत व्हावी, याकरिता जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्यांसह 18 सदस्य या समितीत काम करणार आहेत. याच पद्धतीने प्रांताधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरावर नऊजणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
या गणनेसाठी जिल्हास्तरावर दोन, तर तालुकास्तरावर प्रत्येकी दोन मास्टर ट्रेनरची (प्रशिक्षक) नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्याकडून प्रगणकांना गणना कशी करायची, नोंदवहीत कशी माहिती संकलित करायची, याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मास्टर ट्रेनर नियुक्तीपासून प्रगणन नियुक्ती, त्यांचे प्रशिक्षण, प्रत्यक्ष गणना करण्यासाठी क्षेत्र निश्चिती, कालमर्यादा या सर्व बाबी या नियुक्त केलेल्या समितींना कराव्या लागणार आहेत.
जनगणनेप्रमाणेच प्रत्येक घरी आर्थिक गणना केली जाणार आहे. सर्व कुटुंबे, खासगी व सार्वजनिक आस्थापना आदी ज्या ज्या ठिकाणी नागरिक वास्तव्य करत आहेत अथवा उद्योग, व्यवसाय, सेवा क्षेत्रात सहभागी आहेत, अशा सर्वच ठिकाणी प्रगणक भेटी देणार आहेत.