Sugar Factory Election : दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

Sugar Factory Election : दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूकीची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
Published on
Updated on

बिद्री; पुढारी वृत्तसेवा : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना सन २०२३ ते २०२८ सालासाठी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठीची अंतीम (पक्की) मतदार यादी साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी आज (बुधवारी, दि. १७ ) प्रसिद्ध केली आहे. होऊ घातलेल्या निवडणूक मतदानासाठी 'अ' वर्ग उत्पादक सभासद मतदार ५५ हजार ६५ पात्र ठरले असून 'ब' वर्ग संस्था गटासाठी १ हजार २२ व ४ व्यक्ती असे मतदार पात्र ठरले आहेत. त्यामुळे 'बिद्री' च्या निवडणूकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

गत निवडणूकीतील संचालक मंडळाची मुदत १० ऑक्टोबरला संपली आहे. आतापर्यंत काळजीवाहू संचालक मंडळ काम पाहत असतानाच अडीच महिन्यांपूर्वी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने बिद्री निवडणूकीची प्रक्रिया सुरु केली. 'अ' वर्ग सभासद यादी व 'ब' वर्ग संस्था गट यादी कारखान्याकडून मागवून त्यावर छाननी, मृत सभासद यादी, कच्ची मतदार यादी प्रसिद्ध प्रसिद्ध केली. या यादीवर आक्षेप व हरकती नोंदवण्याची मुदत देवून १२ मे पूर्वी निकाल घोषित केला आहे. या निकालानंतर अंतीम (पक्की) यादी साखर सहसंचालकांनी बुधवारी प्रसिद्ध केली आहे. कारखान्याचे एकूण ६१ हजार ३८४ सभासद आहेत. छाननी होवून ६ हजार ३१९ मतदार मृत सभासद कमी करण्यात आले आहेत. होऊ घातलेल्या निवडणूकीतील मतदानासाठी 'अ' वर्ग सभासद ५५ हजार ६५ सभासद पात्र ठरले आहेत. 'ब' वर्ग संस्था गटासाठी १ हजार २२ मतदार पात्र ठरले आहेत. प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्या १ मार्चच्या आदेशानुसार ३१ जानेवारी २०२१ अर्हता दिनांकापर्यंत 'अ' सभासद तर 'ब' संस्था प्रतिनिधी सभासदांची ३१ जानेवारी २०२० पर्यंतची अंतिम यादी पात्र ठरविली आहे. या निवडणूकीत २१ वरून ४ जागा वाढत २५ संचालक जागा निवडून द्यावयाच्या आहेत. तर कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्राचे ७ गट करण्यात आले आहेत.

गटवार मतदार पात्र संख्या अशी :
गट क्र. १) ९ हजार ११०
गट क्र.२ ) ८ हजार ९६
गट क्र. ३) ८ हजार ८७
गट क्र. ४) ७ हजार ७५
गट क्र. ५) १२ हजार ५५
गट क्र. ६) ७ हजार १९४
गट क्र. ७) ३ हजार ४४८

पक्की अंतीम यादी प्रसिध्द झाल्यापासून येथून पुढे दहा दिवसात निवडणूक निर्णय अधिकारी नेमणे व प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे आता 'बिद्री ' च्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला असून निवडणूक तारखेकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. अंतीम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नेत्यांशी संपर्क वाढविला आहे. त्याचबरोबर 'बिद्री' च्या निवडणूकीचे बिनविरोधाची वारे वहात आहे. प्रथमता कारखान्याचे अध्यक्ष के. पी . पाटील यांनी निवडणूक बिनविरोधासाठी माझा एक हात पुढे असेल असे म्हटले होते. यावर गत निवडणूकीतील विरोधी आघाडीचे प्रमुख खासदार संजय मंडलिक यांनी 'बिद्री' ची निवडणूक बिनविरोध होण्यास हरकत नसल्यानेचे कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगितले. तोच धागा पकडत आमदार हसन मुश्रीफ यांनी निवडणूक बिनविरोधास हिरवा कंदीत दाखवित चार तालुक्यातील गटा -तटाचा उल्लेख करीत सगळे जुळवून आणले तरच….! असा उपहास व्यक्त केला होता. बिनविरोधाचे वारे जरी वाहत असले तरी राजकारणाचा गुंता कोण सोडविणार? हा मुद्दा चर्चिला जात आहे.

बिनविरोधाची चर्चा आतून तयारी !

'बिद्री' च्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे सर्व गट-तट सावध झाले आहेत. सत्तारूढ गटाने निवडणूकपूर्व तयारी करून भागवार मेळाव्यातून 'बिद्री' च्या कारभाराचा लेखा-जोखा मांडला जात आहे. तर विरोधी गटाने सभासद साखर दर, वाढीव ऊस दर, सभासद वाढीव दर्शनी किंमत व अतिरिक्त खर्चाबाबत निवेदने, रास्तारोको केले आहेत. सध्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बिनविरोधाचे वारे वहात असले आहे. खासदार संजय मंडलिक यांनी बिनविरोधासाठी एकत्र येण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी बिनविरोधासाठी मी ही उत्सुक असून पण चार तालुक्याचे २१८ गावांचे क्षेत्र, त्यातील पक्ष, गट-तट यांची सांगड घालावी लागेल. 'बिद्री ' कारभार सक्षम झाला असून पुढील ही कारभार के. पी. पाटील सांभाळतील असे सांगून त्यांचे मेव्हणे ए. वाय. पाटील माझ्या शब्दाबाहेर नाहीत. ते दोघे एकत्र आहेत. असा निर्वाळा व्यक्त केला आहे. त्यामुळे जरी बिनविरोधाची चर्चा होत असली तरी आतून तयारी सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news