

अडकूर : नागनवाडी ( ता. चंदगड ) येथील पृथ्वीराज तुकाराम गावडे (वय १४ ) याचा शनिवारी (दि. २१) गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या कोनेवाडी (ता. चंदगड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. गावातीलच शाळेत सातवी मध्ये शिकत असलेल्या पृथ्वीराज याच्या जाण्याने चंदगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली आहे.
पृथ्वीराज आपल्या आजोबांसोबत शेताकडे गेला असता मित्रांसोबत कबड्डी खेळायला जातो असे सांगून तिथून निघून गेला. तो दुपारी आपल्या मित्रांसह कोनेवाडी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाराऱ्यात पोहण्यास उतरला. याच वेळी तो बुडाला.
ही माहिती कळताच नागणवाडी येथील तरुणांनी बंधाऱ्यात उडी मारून त्याचा शोध घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता. पृथ्वीराज हा नागनवाडी येथील केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये इयता सातवी वर्गात शिकत होता. तो उत्कृष्ट तबला वादक होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, आजी, आजोबा असा परिवार आहे.