

नृसिंहवाडी : उसाच्या रोपांची विक्री करून आलेले पैसे मालकाला न दिल्याच्या रागातून एका वाहन चालकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे घडली आहे. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी तिघा सख्ख्या भावांसह अन्य साथीदारांवर खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या अमानुष मारहाणीत निहालअहमद झाकिरहुसेन मेहतर (वय ३०, रा. शाहूनगर, इचलकरंजी) हा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
संशयित आरोपी दानेश्वर शामराव लोकरे (२८), बसवराज लोकरे (२४) व प्रद्युम्न लोकरे (२६, सर्व रा. शिवनाकवाडी) यांच्या रोपवाटिकेवर निहाल हा चालक आहे. तो उसाची रोपे घेऊन सुरत येथे गेला असता त्यातील १ लाख ३५ हजार रुपये मालकांना दिले नाहीत. यातून २४ ऑगस्ट रोजी पहाटे निहाल याला शिरदवाड येथील पेट्रोल पंपावर गाठून मारहाण केली. त्यानंतर त्याचे अपहरण करून शिवनाकवाडीतील त्यांच्या रोपवाटिकेत आणले व जमावाच्या मदतीने काठ्या व लाथाबुक्क्यांनी त्याला बेदम झोडपले.
मारहाणी दरम्यान निहालने हे पैसे खेडशिवापूर येथील मित्राला दिल्याचे सांगितल्याने आरोपींनी त्याला थेट तिथे नेले. मात्र, रक्कम न मिळाल्याने त्याला पुन्हा शिवनाकवाडीत आणून डांबण्यात आले. अखेर आरोपींनी निहालच्या वडिलांना फोनवरून संपर्क साधून, पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाला मारून टाकू, अशी थेट धमकी दिली. मुलाच्या जीवाच्या भीतीने घाबरलेल्या वडिलांनी १ लाख १० हजार रुपयांची रोकड आरोपींच्या हवाली केली.