Kolhapur Drain water accident: केदारच्या आई-बापांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात!

ओढ्यातून वाहून गेलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Phulewadi Drain water accident
Kolhapur Drain water accident: केदारच्या आई-बापांच्या डोळ्यांतील अश्रू थांबेनात!Pudhari File Photo
Published on
Updated on

फुलेवाडी : फुलेवाडी रिंगरोड परिसरातील अहिल्याबाई होळकरनगरमधील नाल्यात बुडून मृत्यू पावलेल्या केदार कांबळे याच्या आई-बापांचे अश्रू अजूनही थांबेनात. वाहून जाताना बचावलेला त्याचा लहान भाऊ जॉनची तब्येत सुधारत असल्याचे सांगण्यात आले.

शुक्रवारी सकाळी केदार व जॉन हे सख्खे भाऊ शाळेतील दांडिया कार्यक्रमात सहभागी झाले होते. शनिवारी दुपारी साने गुरुजी परिसरात आत्याच्या घरी ते जेवणासाठी साहित्य देऊन संध्याकाळी जेवणासाठी येतो असे सांगून आले होते.

नेहमी घराबाहेर पडताना दोघे भाऊ एकत्र असत. साहित्य देऊन आल्यानंतर शिकवणीसाठी जातो म्हणून दोघेही वडिलांना सांगून घराबाहेर पडले. शिवतेज तरुण मंडळाच्या चौकात आल्यानंतर शेजारी असणार्‍या नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्या पाण्यात खेळण्याचा मोह दोघांनाही आवरला नाही. खेळता खेळता लहान भाऊ जॉन पाण्यात पडल्यामुळे क्षणाचाही विचार न करता केदार त्याला वाचवण्यासाठी पाण्यात पडला.

परंतु, नाल्याच्या पाण्याला वेग जास्त असल्यामुळे त्या प्रवाहात जवळजवळ 20 फूट ते पुढे वाहत गेले. गल्लीच्या क्रॉस झालेल्या सिमेंटच्या स्लॅबखाली ते अडकून पडले. त्यावेळी त्यांनी ‘वाचवा वाचवा’ असे म्हटल्यानंतर परिसरातील नागरिक सलीम मुल्ला, कृष्णात देवकुळे, किरण पाटील, चंद्रकांत पवार, अमृता हिरेमठ, सना मुल्ला, रूपाली कांबळे, प्रकाश कांबळे, सौरभ कांबळे, दीपक डोंगळे व शिवतेज तरुण मंडळच्या कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करून त्यांना पाण्यातून बाहेर काढले.

केदारची तब्येत गंभीर असल्यामुळे त्याला महापालिकेच्या व्हॅनमधून सीपीआरमध्ये नेण्यात आले; परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. केदार मृत झाल्याचे घोषित करताच आई-वडिलांनी सीपीआरमध्येच टाहो फोडला. मुलाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने आई-बापांच्या डोळ्यातील अश्रू अजूनही थांबलेले नाहीत.

मदतीचा हात

माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी कुटुंबाची भेट घेऊन 25 हजार रुपयांची मदत केली. परिसरातील नागरिकांनी धान्याच्या रूपात मदत केली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर व आ. अमल महाडिक यांनी कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत मदतीचे आश्वासन दिले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे प्रशांत साळुंखे, विजय देसाई, योगेश ओटवकर, अमोल माने, किरण पाटील, कुलदीप सावरतकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news