Diwali festival 2026 | कोल्हापूरकरांनी दिवाळी खरेदीसाठी जागवली रात्र

महाद्वार रोड, राजारामपुरीसह प्रमुख बाजारपेठांत पहाटेपर्यंत गर्दी
Diwali festival 2026
कोल्हापूरकरांनी दिवाळी खरेदीसाठी जागवली रात्र
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीचा उत्साह दुणावला असून रविवारपासून सुरू होणाऱ्या प्रकाशपर्वाच्या खरेदीसाठी कोल्हापूरकरांनी सहकुटुंब गर्दी केल्याने उत्साह टीपेला पोहोचला आहे. गर्दीमुळे शहरातील प्रमुख बाजारपेठांमधील दुकाने व शोरुम्स पहाटेपर्यंत सुरू होती.

नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी आल्याने रविवारी घरोघरी आणि व्यापारी आस्थापनांमध्ये होणाऱ्या लक्ष्मीपूजनाच्या मंगल मुहूर्तावर संपूर्ण बाजारपेठेत मोठी उलाढाल होत आहे. महाद्वार रोड, गुजरी, राजारामपुरी, लक्ष्मी रोड, भवानी मंडप आणि शाहूपुरी, स्टेशन रोड परिसर गर्दीने फुलून गेले होते. अनेक दुकाने आणि शोरुम्ससमोर व्यापाऱ्यांनी आकर्षक सजावट केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर ऑफर्स, सूट आणि फेस्टिव्हल डिस्काऊंटच्या घोषणांचा दिवस-रात्र भडिमार सुरू आहे.

टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन आणि स्मार्ट फोनच्या शोरूम्समध्ये ग्राहकांची झुंबड उडाली आहे. झीरो टक्के फायनान्स आणि आकर्षक एक्स्चेंज ऑफर्समुळे नोकरदार व मध्यमवर्गीय ग्राहकांनी गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीवर भर दिला आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याची नाणी, चांदीच्या मूर्ती, पूजेचे ताजे साहित्य आणि व्यावसायिक वहीपूजनाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली. पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नवीन वाहनांची डिलिव्हरी आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी होणार आहे. पूजेचे साहित्य, फटाके, पर्स, गिफ्ट हॅम्पर्स, फराळाचे साहित्य, किल्ले, मावळे, रांगोळी, विद्युत रोषणाईच्या माळा, आकाशकंदील खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.