

कौलव : यावर्षीचा साखर कारखान्याचा गळीत हंगाम मध्यावर आला असून कोल्हापूर विभागात 1 कोटी 22 लाख 61 हजार 380 टन उसाचे गाळप होऊन 1 कोटी 26 लाख 53 हजार 559 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. विभागाचा सरासरी साखर उतारा 10.37 टक्के एवढा आहे. सरासरी साखर उताऱ्यात राजाराम बापू (सुरुल) व ऊस गाळपात जवाहर कारखान्याने आघाडी घेतली आहे.
यंदाचा गळीत हंगाम नोव्हेंबरच्या सुरुवातीला सुरू झाल्यामुळे सर्वच कारखान्यांनी पहिल्यापासूनच वेगाने गाळपाला सुरुवात केली आहे. कमी दिवसांत जास्तीत जास्त गाळप करण्याचा पॅटर्न रूढ झाला आहे. दि. 1 जानेवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 22 कारखान्यांनी 75 लाख 32 हजार 246 टन उसाचे गाळप केले असून 79 लाख 7 हजार 405 क्विंटल साखर उत्पादित केली आहे. जिल्ह्याचा सरासरी उतारा 10.46 टक्के एवढा आहे. जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी 55 लाख 57 हजार 440 टन उसाचे गाळप करून 58 लाख 54 हजार 870 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा 10.49 टक्के एवढा आहे.
खासगी कारखान्यांनी 19 लाख 74 हजार 806 क्विंटल साखरेचे उत्पादन केले असून खासगी कारखान्यांचा सरासरी उतारा 10.39 टक्के आहे. कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती साखर कारखान्याचा 12.63 टक्के सर्वाधिक उतारा असून जवाहर कारखान्याने विभागात सर्वाधिक 8 लाख 72 हजार 675 टन उसाचे गाळप केले आहे.
खासगी कारखान्यांचा डंका...
खासगी कारखान्यांनी 13 लाख 23 हजार 214 टन ऊस गाळप करून 12 लाख 72 हजार 914 क्विंटल साखरेचे उत्पादन केली असून सरासरी उतारा 9.91 टक्के आहे. सांगली जिल्ह्यात राजारामबापू कारखान्याच्या सुरूल युनिटने 11.93 टक्के एवढा विक्रमी उतारा राखला आहे. सोनहिरा साखर कारखान्याने 5 लाख 66 हजार 775 टन एवढे सर्वाधिक गाळप केले आहे. विभागातील कारखान्यांचा हंगाम मध्यावर आला असून जास्तीत जास्त गाळपासाठी सर्वच कारखान्यांत उसासाठी टोकाची स्पर्धा सुरू आहे.