

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गोकुळ, कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती या जिल्ह्यातील महत्त्वाच्या आर्थिक संस्था महायुतीकडे गेल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर राजकीय सत्ता स्थापन करण्याचे मोठे आव्हान तयार झाले आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक नाडी आहे. थेट शेतकर्याला कर्जपुरवठा याच संस्थेमार्फत होतो. याची सत्ता अजित पवार राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्याकडे आहे. तेच राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आहेत. सुमारे चार हजार कोटी रुपयांची उलाढाल असणारा गोकुळ हा जिल्ह्याच्या राजकारणाचा बलाढ्य आर्थिक गड. हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही संस्थाही अजित पवार राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.
कोल्हापूर जिल्हा शेती उत्पन्न बाजार समितीवर विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे वर्चस्व आहे. तसेच शेतकरी सहकारी संघाची सत्ताही जनसुराज्य शक्ती पक्षाकडे आहे. त्यामुळे या चारही महत्त्वाच्या आर्थिक सत्तेवर महायुतीचा कब्जा आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसमोर राजकीय सत्ता स्थापन करण्याचे मोठे आव्हान आहे.
आगामी काळात कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी महापालिका, कोल्हापूर जिल्हा परिषद, 12 पंचायत समित्या, दहा नगरपालिका, तीन नगरपरिषदा येथे निवडणुका व्हायच्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व दहा विधानसभा मतदारसंघांतून महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघापैकी एक महाविकास आघाडीकडे, तर एक शिवसेना शिंदे गटाकडे आहे. राज्यसभेचे खासदार भाजपचे आहेत. विधान परिषदेचे दोन आमदार काँग्रेसचे आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला खूप मोठ्या प्रमाणावर राजकीय सत्तेसाठी कष्ट घ्यावे लागणार आहेत.
यापूर्वी कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडीची सत्ता होती. राज्यात कोठे नव्हती तेव्हा कोल्हापूर महापालिकेत महाविकास आघाडी अस्तित्वात होती. महापालिकेच्या सत्तेत काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर शिवसेनाही सत्तेत होती. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर शिवसेना नंतर सत्तेत सहभागी झाली. कोल्हापूर जिल्हा परिषदेत पहिली अडीच वर्षे भाजपकडे, तर उर्वरित अडीच वर्षे काँग्रेसकडे अध्यक्षपद होेते. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे राजकीय वर्चस्वातून पाहिले जात आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जंगी सामना पाहायला मिळणार आहे.
लोकसभा
कोल्हापूर - शाहू महाराज - काँग्रेस
हातकणंगले - धैर्यशील माने - शिंदे शिवसेना
राज्यसभा
धनंजय महाडिक - भाजप
विधानसभा
कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर - शिंदे शिवसेना
कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक - भाजप
करवीर - चंद्रदीप नरके - शिंदे शिवसेना
कागल - हसन मुश्रीफ - अजित पवार राष्ट्रवादी
राधानगरी - प्रकाश आबिटकर - शिंदे शिवसेना
चंदगड - शिवाजी पाटील - अपक्ष भाजप स्वीकृत
पन्हाळा - विनय कोरे - जनसुराज्य शक्ती
हातकणंगले - अशोक माने - जनसुराज्य शक्ती
इचलकरंजी - राहुल आवाडे - भाजप
शिरोळ - राजेंद्र पाटील-यड्रावकर -
शाहू आघाडी-शिंदे शिवसेना स्वीकृत
विधान परिषद
सतेज पाटील - काँग्रेस
जयंत आसगावकर - काँग्रेस