

कोल्हापूर : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यात लोकसभेचे तीन मतदारसंघ होणार आहेत. भविष्यात लोकसभेबरोबर विधानसभेच्याही मतदारसंघात वाढ होणार असून त्याची संख्या १० वरून १४ पर्यंत जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले असे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शाहूवाडी, हातकणंगले, इचकरंजी, शिरोळ हे कोल्हापूर जिल्ह्यातील चार आणि सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल आणि राधानगरी आणि चंदगड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
या मतदारसंघाच्या रचनेत आता बदल होणार आहे. यापूर्वीची मतदारसंघाची रचना २००१ च्या जनगणनेवर आधारित झाली होती. या विधेयकानुसार मतदारसंघ पुनर्रचना २०२७ च्या जनगणनेवर होईल. त्याकरिता मतदारसंघ पुनर्रचना आयोगाची स्थापना होईल. या आयोगाकडून मतदार संघ पुनर्रचनेचे नेमके सूत्र निश्चित केले जाईल. त्यानुसार पुढील प्रक्रिया पार पडेल.
मतदारसंघ पुनर्रचनेनुसार जिल्ह्यात लोकसभेच्या दोन ऐवजी तीन मतदारसंघ होतील. कोल्हापूर शहर, करवीर, गगनबावडा, पन्हाळा असा एक; कागल, आजरा, गडहिंग्लज, चंदगड, राधानगरी असा दुसरा तर हातकणंगले, शिरोळ, शाहूवाडी यासह सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश असलेला असा तिसरा मतदार संघ होण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात आयोगाचे जे सूत्र ठरेल, त्यानुसार सीमांकन होऊन मतदारसंघाची रचना होईल. मात्र, लोकसभेसाठी वाढवण्यात आलेल्या मतदारसंघाची संख्या विचारात घेता कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे तीन खासदार असतील.