

एकनाथ नाईक
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत असून, गेल्या केवळ 18 महिन्यांत तब्बल एक लाख 66 हजार 626 नागरिकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीपीआर येथे जानेवारी ते 14 जुलै या कालावधीत 3 हजार 754, तर ग्रामीण भागात एप्रिल ते जून या तीन महिन्यांत 31 हजार 128 जणांचा चावा घेतला आहे. जिल्ह्यात साडेसहा महिन्यांत तब्बल 34 हजार 882 कुत्र्यांनी फोडले आहे. कुत्र्याने चावा घेतल्याने महिन्याला सीपीआरमध्ये 639, ग्रामीण रुग्णालयात 481 तर प्राथमिक आरोग्य केंद्रांत 8,111 जण उपचारासाठी दाखल होतात.
जिल्ह्यात 45 हजारांहून अधिक भटकी कुत्री असल्याचे सांगितले जाते. रात्री-अपरात्री कामावरून घरी परतणारे कामगार, पादचारी आणि दुचाकीस्वार हे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमुख लक्ष्य ठरत आहेत. चावा घेण्याच्या घटनांमुळे अनेकजण जखमी झाले. कुत्र्याच्या लाळेतून ‘रेबीज’ आजार होण्याची भीती असल्याने, चावा घेतल्यानंतर किंवा नख लागल्यानंतरही रेबीज प्रतिबंधक लस घेण्यासाठी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे होणारे हल्ले ही एक गंभीर समस्या बनली असून, यावर प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.