कोल्हापूर : दहावीचा ऑनलाईन निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मंगळवारी जाहीर केला. यावर्षीही कोल्हापूर जिल्हा निकालात कोल्हापूर विभागात अव्वल राहिला आहे. जिल्ह्यातील 97.52 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनी कर्तृत्व सिद्ध केले असून, निकालात पुन्हा एकदा मुलीच अव्वल ठरल्या आहेत.
कोल्हापूर विभागाने दहा वर्षे राज्यात दुसरे स्थान कायम राखले आहे. निकालात यावर्षी 0.58 टक्क्याने घट झाली आहे. गेल्यावर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल 97.45 टक्के होता. यंदा त्याचे प्रमाण 96.87 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 98.19 टक्के असून, मुलांपेक्षा 2.45 टक्क्यांनी ते अधिक असल्याची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावर्षीचा निकाल ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातार्यातील 2,327 माध्यमिक शाळांमधील 357 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. कोल्हापूर विभागातून 1 लाख 29 हजार 421 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 1 लाख 25 हजार 380 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी 96.87 आहे. मुला-मुलींच्या निकालाची तुलना करता, यावर्षी 69 हजार 588 मुले परीक्षेला बसली. त्यापैकी 66 हजार 630 उत्तीर्ण झाली. उत्तीर्णतेचे प्रमाण 95.74 टक्के आहे. 59 हजार 833 मुली परीक्षेला बसल्या, त्यातून 58 हजार 750 उत्तीर्ण झाल्या. निकालाची टक्केवारी 98.19 आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 53 हजार 726 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 52 हजार 394 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 97.52 आहे. सांगलीतून 38 हजार 492 विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 36 हजार 989 उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 96.09 आहे. सातारा जिल्ह्यातून 37 हजार 203 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून 35 हजार 997 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 96.75 आहे. कोल्हापूर विभागातून 1,505 विद्यार्थ्यांनी पुनर्परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यापैकी 1,492 विद्यार्थी परीक्षेला बसले असून, 577 उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी 38.67 आहे. दहावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी विभागात 7 कॉपी प्रकरणे होती. यंदा कॉपीची 6 प्रकरणे आढळली आहेत.
ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. यासाठी http:/// verification.mh- ssc.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. गुणपडताळणी मुदत 14 ते 28 मेपर्यंत असून, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी ई-मेल, हस्तपोहोच, रजिस्टर पोस्ट यापैकी एक पर्याय विद्यार्थ्यांना वापरता येणार आहे. दहावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांच्या वाटपाबाबत विभागीय मंडळातर्फे लवकरच कळविण्यात येणार आहे. दरम्यान, जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणार्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधारच्या विद्यार्थ्यांना 15 मेपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.