

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात रविवारी सर्वदूर पावसाने तुफान बॅटिंग केली. दुपारी दोनच्या सुमारास अचानक नभ दाटून आले आणि पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. बघता बघता पावसाने जोर धरला. सुमारे तासाभराच्या कोसळधारांनी रस्ते जलमय झाले तर सखल भागाचे तळ्यात रूपांतर झाले. अनेक ठिकाणी दुचाकी आणि रिक्षांची चाके बुडतील इतके पाणी साचले. वाहतूक संथ झाली, बाजारपेठांमध्ये त्रेधातिरपिट उडाली. नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावत जनजीवनावर काही काळ परिणाम झाला.
गेल्या तीन दिवसांपासून अधून मधून हलका शिडकावा होत असताना रविवारी मात्र पावसाने अचानक जोरदार ‘कमबॅक’ केला. तासाभरात शहरातील जयंती नाला, असेंब्ली रोड, स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर, कोंडा ओळ, फोर्ड कॉर्नर, लक्ष्मीपुरी धान्य लाईन, ताराराणी चौक ते फ्लायओव्हर परिसरासह अनेक रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. वाहनचालकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली. शहराबरोबरच गगनबावडा, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी आदी तालुक्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर शहरात सायंकाळनंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. अधूनमधून रिपरिप बरसल्यानंतर रात्री पावसाचा जोर वाढला होता.
आजपासून व्याप्ती वाढणार
पुणे : राज्यातील बहुतांश भागात सोमवार, दि. २९ जून ते गुरुवार, दि. २ जुलै या कालावधीत दमदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अमरावती या जिल्ह्यांना १ आणि २ जुलै रोजी मुसळधार तर राज्याच्या उर्वरित भागाला ‘यलो अलर्ट’चा अंदाज देण्यात आला आहे. जून महिन्यात कमी पाऊस झाला. मात्र, जुलैची सुरुवात चांगली होत आहे. राज्याच्या बहुतांश भागात दमदार पावसाचा अंदाज आहे. त्याची सुरुवात रविवार (दि. २८) पासूनच झाली. हवामान तज्ज्ञांच्या मते, २९ जून ते २ जुलै या कालावधीत मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे.
आजही ‘यलो अलर्ट’
हवामान विभागाने सोमवारी (दि. २९) जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या २४ तासांत गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. कडवी, पाटगाव, घटप्रभा, जांबरे आणि धामणी धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला असून पुढील २४ तासांतही जोर कायम राहण्याची शक्यता आहे.