कोल्हापूर ः राजकीय पक्षांसह स्थानिक नेत्यांनी पणाला लावलेली प्रतिष्ठा, गेले पंधरा दिवस सुरू असलेले प्रचाराचे घमासान, त्यातून झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीका, त्यामुळे टोकाला गेलेली ईर्ष्या अन् तितक्याच चुरशीने आणि उत्साही वातावरणात जिल्ह्यात बुधवारी उच्चांकी 76.25 टक्के मतदान झाले. मतदानाची वेळ संपल्यानंतरही रांगेत मतदार उभे असल्याने 204 मतदान केंद्रांवर सहानंतरही मतदान सुरू राहिले. पैसे वाटप केल्याच्या संशयावरून तसेच कार्यकर्ते आमने-सामने आल्याने झालेल्या वादाचे किरकोळ प्रकार वगळता मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील एकूण 121 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले.
जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांतील एकूण सर्व 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. नवमतदारांसह महिला, वयोवृद्धांसह दिव्यांग मतदारांतही उत्साह होता. सकाळच्या सत्रात वयोवृद्ध मतदारांची संख्या अधिक जाणवत होती. मतदान करणार्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येत होता.
मतदारांचा उत्साह सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर दिसत होता. जिल्ह्यात पहिल्या दोन तासांत सकाळी नऊ वाजेपर्यंत 8.78 टक्के मतदान झाले होते. पहिल्या दोन तासांतच सुमारे तीन लाखांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सकाळी नऊनंतरही मतदानाचा वेग काहींसा वाढला. पुढच्या दोन तासांत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 20.59 पर्यंत गेली. यानंतरही मतदानाचा वेग वाढतच राहिला. यामुळे सकाळी 11 नंतरही अनेक मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्याचे चित्र अनेक मतदारसंघांत होते.
सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत सरासरी 19 टक्के मतदान झाले. यामुळे सकाळी सात वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 38.56 टक्क्यांपर्यंत गेली होती. दुपारी एक नंतर मात्र, मतदानाचा वेग काहींसा कमी झाला. दुपारी एक ते तीन या वेळेत सरासरी 16 टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात 54.06 टक्के इतके मतदान झाले होते. दुपारी तीन नंतर पुन्हा मतदानाला वेग आला. कार्यकर्त्यांकडून मतदान न केलेल्यांना संपर्क साधून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत होते. यामुळे अनेक ठिकाणी गटागटाने, सहकुटुंब लोक मतदानासाठी येत होते. यामुळे दुपारी तीन-चार नंतर काही मतदान केंद्रांवरील गर्दी पुन्हा वाढत गेली. मात्र, अनेक मतदान केंद्रे दुपारनंतर ओस पडलेलेही चित्र होते. दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत केवळ 13.93 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत 67.97 टक्के मतदान झाले होते.
अखेरच्या तासाभरात मतदानासाठी कार्यकर्त्यांसह मतदारांचीही धावपळ उडाली होती. मतदान केंद्र, मतदान खोली, मतदान यादीतील क्रमांक आदींची माहिती देत कार्यकर्ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी मदत करत होते. जिल्ह्यातील 204 मतदान केंद्रांवर सायंकाळी सहानंतर मतदार रांगेत थांबले होते. त्यांना टोकन क्रमांक देऊन, त्या सर्वांची मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. यामुळे जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते. रात्री पावणे नऊच्या सुमारास इचलकरंजी मतदार संघातील अखेरच्या मतदान केंद्रावरील प्रक्रिया पूर्ण झाली. जिल्ह्यात 76.25 टक्के इतक्या उंच्चाकी मतदानाची नोंद झाली. अंतिम आकडेवारी उद्या जाहीर करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सात विद्यमान आमदार, सहा माजी आमदारांसह राष्ट्रीय व राज्यस्तरावरील पक्ष, राज्यस्तरावरील नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष अशा 121 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. मतदारांनी कुणाला कौल दिला, हे येत्या शनिवारी स्पष्ट होणार आहे.
दरम्यान कसबा बावडा येथे शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि समर्थक व शिवसेना ठाकरे गटाच्या शहरप्रमुख यांच्यात वादावादी झाली. त्यातून महाविकास आघाडीचेही कार्यकर्ते एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टाकाळा येथे पैसे वाटपाच्या संशयावरून वादावादीचा प्रकार घडला. सायंकाळी कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर आणि प्रतिस्पर्धी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर समर्थकांत धक्काबुक्कीचा प्रकार झाला. यामुळेही काही काळ तणाव निर्माण झाला होता. यासह जिल्ह्यातही किरकोळ बाचाबाची, वादावादीचे प्रकार घडले. काही ठिकाणी मतदान यंत्रेही बदलली. मात्र, ती तत्काळ बदलण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.