

अनिल देशमुख
कोल्हापूर : जिल्ह्यात विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची संख्या वाढणार आहे. विधानसभेच्या दहा मतदारसंघांत आणखी दोन ते चार, तर लोकसभेच्या सध्या दोन मतदारसंघांत आणखी एका मतदारसंघाची भर पडेल, अशी शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात विधानसभेचे बारा, तर लोकसभेचे तीन मतदारसंघ होतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणना पूर्ण झाल्यानंतरच मतदार पुनर्रचना प्रक्रियेला वेग येणार असला, तरी राजकीय वर्तुळात आतापासूनच वाढीव मतदारसंघांची चर्चा सुरू असून त्यानुसार जोडण्याही सुरू झाल्या आहेत.
जनगणनेने अभावी रखडलेल्या मतदारसंघ पुनर्रचनेचे काम जून 2027 पासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. त्याद़ृष्टीने प्राथमिक तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिला प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी केंद्र शासन महिला आरक्षण सुधारणा विधेयक (नारी शक्ती वंदन) आणत आहे. याकरिता संसदेचे विशेष अधिवेशनही होत आहे. यानंतर लोकसभा आणि विधानसभेची महिला सदस्यांची संख्या निश्चित होईल. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभेच्या एकूण वाढीव जागाही स्पष्ट होतील, अशी शक्यता आहे.
असे वाढणार मतदारसंघ
सध्या तीन ते साडेतीन लाख मतदार संख्येसाठी विधानसभेचा एक, तर 18 ते 19 लाख मतदार संख्येसाठी लोकसभेचा एक मतदारसंघ आहे. पुनर्रचनेत अडीच लाखांपर्यंतचा विधानसभेचा एक मतदारसंघ, तर दहा ते बारा लाखांपर्यंतचा लोकसभेचा एक मतदारसंघ होण्याची शक्यता आहे. यानुसार जिल्ह्यात विधानसभेच्या दहा मतदारसंघांत आणखी दोन ते चार जादा मतदारसंघ होतील, लोकसभेच्या दोन मतदारसंघांत आणखी एका मतदारसंघाची भर पडण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्ष लागले कामाला
मतदारसंघ वाढणार असल्यानेे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पुनर्रचित होणारे मतदारसंघ, त्यातील महिला, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव मतदारसंघ, संभाव्य उमेदवार याची चाचपणी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे.
जनगणनेनंतर प्रक्रिया; 2029 च्या निवडणुकीत अंमलबजावणी
मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेला जनगणनेचे काम पूर्ण झाल्यानंतर वेग येणार आहे. जनगणनेनंतर महिला, अनुसूचित जाती आणि एकूण लोकसंख्या जाहीर होईल. त्याची अंमलबजावणी 2029 च्या लोकसभा
आणि विधानसभा निवडणुकीत होईल.
शहराला मिळणार दोन आमदार
नव्या पुनर्रचनेत कोल्हापूर महापालिका क्षेत्रासाठी दोन आमदार मिळतील, अशी शक्यता आहे. करवीर तालुक्यातील काही गावांचा सध्या शहरी मतदारसंघात समावेश होतो, ती सर्व गावे वगळून करवीर मतदारसंघ स्वतंत्र तालुक्याचाच होईल, अशीही शक्यता आहे. इचलकरंजी आणि परिसरातील गावांसाठी मिळूनही दोन मतदारसंघ होतील, अशीही शक्यता आहे.