

कोल्हापूर : राज्यातील शेतकर्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ कोल्हापुरात शनिवारी दिव्यांग बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. कडू यांच्या आंदोलनाची सरकारने तत्काळ दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात, त्यांच्या जीविताचे बरेवाईट झाल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा देत दिव्यांगांनी थेट एसटी बसच्या चाकाखाली झोपून चक्काजाम आंदोलन केले.
प्रहार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली तावडे हॉटेल चौकात झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा, दिलेले आश्वासन पाळून कर्ज माफ करावे आणि दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये पेन्शन मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन पुकारले आहे. मात्र, शासनाने अद्यापही याची दखल न घेतल्याने हे आंदोलन केले.
सकाळी अकराच्या सुमारास कार्यकर्ते तावडे हॉटेल चौकात जमा झाले. यावेळी काही संतप्त महिलांनी थेट एसटी बससमोर धाव घेत चाकाखाली झोपण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पोलिसांनी या महिलांना बाजूला केले. मात्र, आंदोलकांनी चौकातील रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कावळा नाका येथूनच टेंबलाईच्या दिशेने येणारी एसटी बस, ट्रक व अन्य वाहने दुसर्या मार्गाने वळवली. सुमारे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
आंदोलनात देवदत्त माने, रुकय्या केरूरे, संतोष रांजणगे, विष्णुपंत पाटील, विकास चौगुले, अरुण विभुते, जयश्री शिंदे, जानकी मोकाशी, आसमा स्वार, नलिनी डवर, शिवराज शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, पाटील आदी उपस्थित होते. शहर पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक यांच्यासह सुमारे 50 पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस होते. त्यामुळे आंदोलनस्थळाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.