Kolhapur News : थेट पाईपलाईनच्या पाण्याचे ‘नो टेंशन’

काळम्मावाडीत होणार वीज मंडळाचे सब स्टेशन; कोल्हापूरकरांना अखंड पाणीपुरवठ्याची आशा
water supply
पाणीपुरवठाpudhari
Published on
Updated on

सतीश सरीकर

कोल्हापूर ः तब्बल पाचशे कोटींच्या थेट पाईपलाईन योजनेसाठी बिद्रीतून 30 किलोमीटर लांबपर्यंत उघड्यावरून विद्युत वाहिन्या नेल्या आहेत. परिणामी, पाऊस, वादळी वार्‍याबरोबरच माकडांच्या उच्छादामुळे वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा ठप्प होतो. त्यामुळे थेट पाईपलाईनमध्ये अनेक अडथळे येत होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आता काळम्मावाडी धरण क्षेत्रातच 16 कोटी 57 लाखांचे विजेचे सब स्टेशन केले जाणार आहे. त्यामुळे 24 तास विद्युत पुरवठा होऊन कोल्हापूरकरांना थेट पाईपलाईनच्या पाण्याचे टेंशन राहणार नाही.

काळम्मावाडी योजनेसाठी बिद्री सबस्टेशन येथून 33 के. व्ही. एक्स्प्रेस फिडर लाईनद्वारे विद्युत पुरवठा होतो; परंतु ही 33 के. व्ही. एक्स्प्रेस फिडर लाईन दुर्गम, डोंगराळ भागातून थेट पाईपलाईन योजनेच्या पंप हाऊसपर्यंत जाते. अतिवृष्टीच्या काळात एक्स्प्रेस फिडर लाईनवर वादळी वारा व मुसळधार पावसामुळे झाडे आणि फांद्या पडून विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे दररोजच्या पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक, पंपिंगच्या वेळा याचा ताळमेळ घालण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागत आहे. सब स्टेशन सुरू झाल्यानंतर हा ताण लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. काळम्मावाडी परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांनाही या प्रकल्पाचा फायदा होणार आहे. सबस्टेशनमुळे स्थानिक पातळीवर वीजपुरवठा स्थिर होईल. पिकांसाठी सिंचनाचे पंप, पिण्याच्या पाणी योजना आणि लघुउद्योगांनाही वीज उपलब्ध होईल.

ही योजना सुरू झाल्यानंतर पाईपलाईनला गळती आणि वीज गायब होत असल्याने ठप्प होणारा पुरवठा यामुळे काही दिवस मुबलक पाणी, काही दिवस तुटवडा, असा खेळ सुरू होता; मात्र आता सबस्टेशन उभारणीमुळे ही परिस्थिती कायमस्वरूपी सुधारेल, अशी आशा आहे. विजेची अडचण सर्वात मोठा अडथळा होता; परंतु 16 कोटी 57 लाखांच्या सबस्टेशन प्रकल्पामुळे ती समस्या संपुष्टात येणार आहे.

थेट पाईपलाईन योजना ही कोल्हापूरच्या भविष्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. योजनेसाठी बिद्रीहून उघड्यावर विद्युत वाहिन्या आणल्या आहेत. पाऊस, वादळवार्‍यामुळे अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे वीज मंडळाच्या अधिकार्‍यांकडून काळम्मावाडी धरण क्षेत्रात सबस्टेशनचा प्रस्ताव तयार करून घेतला आहे. 16 कोटी 50 लाखांचा प्रस्ताव असून तो राज्य शासनाकडे पाठविला आहे.
हर्षजित घाटगे, जल अभियंता

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news