कोल्हापूर ः महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरात डेंग्यू प्रतिबंधक सर्वेक्षण सुरू केले आहे. यामध्ये शहरातील इमारतींच्या बेसमेंटमध्ये तुंबलेल्या पाण्यात डेंग्यू डासांच्या अळ्या मोठ्या प्रमाणात आहेत. यावरून आगामी काळात डेंग्यूचा मोठा प्रादुर्भाव वाढण्याचा गंभीर इशारा मिळत आहे.
महिनाभरात झालेल्या अवकाळी पावसानंतर आणि सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणी, विशेषतः सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, रिकाम्या प्लॉटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या पाण्यात डेंग्यू पसरवणार्या एडिस इजिप्ती डासांची अंडी व अळ्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. सर्वेक्षणातील अहवालानुसार, गेल्या 15 दिवसांत सर्वेक्षण केलेल्या 45 हजार घरांपैकी 600 ठिकाणी डेंग्यू डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. जीवबा नाना, शिवाजी पेठ, साळोखेनगर, विक्रमनगर, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, जरगनगर, वर्षानगर, कनाननगर, विक्रमनगर, नाळे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत यासह परिसरातील भागांमध्ये डेंग्यू डासांचे अड्डे आढळून आले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी 1,000 वस्तूंमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.