

कोल्हापूर : जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलावासह धरणांत जूनमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा असल्याने जिल्ह्यावर पुराचे संकट कायम आहे. जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्यास पुराची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने पुराची टांगती तलवार कायम आहे.
मे महिन्यांपासूनच पावसाने सुरुवात केल्याने पाटबंधारे विभागास बंधार्यातील बरगे काढण्यास संधी मिळाली नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले. जूनमध्ये पावसाचा जोर वाढल्याने जून महिन्यात पंचगंगा नदीस दुसर्यांदा पूर आला. या पावसाने जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी, वारणा या प्रमुख धरणांसह सर्वच धरणांत 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुराचे संकट कायम आहे.
गतवर्षीपेक्षा यंदा जूनमध्ये सर्वच धरणांत दुप्पट पाणीसाठा झाल्याने पूरस्थिती उद्भवण्याचा धोका वाढला आहे. जुलैमध्ये दोन-तीन दिवसांच्या टप्प्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिल्यास पुराचे पाणी वाहून जाण्याची शक्यता आहे; मात्र पावसाने उघडीप न दिल्यास मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसाचे पाणी आणि धरणांतील पाणी नदी पात्रात वाढून पुराची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.