

सरवडे: सोळांकूर (ता राधानगरी) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील शासकीय निवासस्थानाबाहेर असणारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती महेश कोले (रा. सर्किट हाऊसच्या पाठीमागे, ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांची इलेक्ट्रिक फोर व्हीलर अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री दोनच्या सुमारास पेटवून दिल्याची घटना घडली.
या घटनेने राधानगरी तालुक्यात खळबळ उडाली असून, रुग्णालयाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी वा मोठी वित्तहानी झाली नाही. डॉ कोले यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध राधानगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित सिद व कर्मचारी करत आहेत.
सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीसमोर डॉ.ज्योती कोले नेहमीप्रमाणे आपली इलेक्ट्रिक फोर व्हीलर (एम एच ०९ जी एक्स ००४७)कार पार्क करतात. आज पहाटे दोनच्या सुमारास या गाडीला अचानक आग लागल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, जळणाऱ्या इलेक्ट्रिक कारच्या अगदी समोरच डिझेलने भरलेली रुग्णवाहिका उभी होती. त्याचवेळी रुग्णालयात ८ रुग्ण उपचारासाठी दाखल होते. आगीने रौद्र रूप धारण केले असते, तर रुग्णालय परिसरात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णांच्या नातेवाइकांनी तत्काळ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांनी माहिती दिली. सुरक्षा रक्षकांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन उपकरणाच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आग पसरण्यापूर्वीच विझवण्यात यश आले आणि परिणामी संभाव्य मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती महेश कोल्हे यांनी या घटनेप्रकरणी राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गाडी अज्ञाताने पेटवली की अन्य कारणांचा पुढील तपास राधानगरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेळके व जठार करत आहेत.