

चंदगड : चंदगड तालुक्यात मटक्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे अनेक कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. हे प्रकार पूर्वीपासूनच चालत आलेले असून आता तंत्रज्ञानाच्या मदतीने तो आणखी वाढला आहे. ऑनलाईन पद्धतीने मटका चालत असल्यामुळे पोलिसांसाठी त्यावर कारवाई करणे अधिक कठीण झाले आहे.
पोलिसांना याची माहिती नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. कारण मटका बुकी आणि पोलिसांमध्ये जुने साटेलोटे असल्याची चर्चा सर्वत्र आहे. शिनोळी फाटा हा भाग मटका आणि जुगाराचे मुख्य केंद्र बनला आहे. कर्नाटक सीमेला लागून असल्यामुळे बुकी आणि खेळणारे सहजपणे लपून बसू शकतात. गेल्या वर्षी येथे जुगाराच्या अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. तरीही आजही येथे हे अड्डे राजरोस सुरू आहेत. चंदगड शहरात अनेक मटके अड्डे आहेत. पोलिसांनी काही वेळा कारवाई केली असली, तरी काही दिवसांनंतर पुन्हा हा व्यवसाय सुरू होतो. एका मोठ्या राजकीय नेत्याच्या वरदहस्ताखाली शहरात दोन ठिकाणी मटका आणि जुगाराचे अड्डे सुरू आहेत. हेरे, पाटणे फाटा, तिलारी, हलकर्णी फाटा, कोवाड, कुदनूर, तडशीनहाळ, माडवळे, तुडये फाटा आणि माणगाव यांसारख्या मोठ्या गावांमध्येही मटका बुकी सक्रिय आहेत.
बेळगावातील बुकींचे जाळे
चंदगड तालुका कर्नाटक सीमेजवळ असल्यामुळे, शिनोळी, देवरवाडी, कुद्रेमणी, तुडये आणि होसूर या गावांमध्ये फार्म हाऊसवर मटका घेतला जातो. या व्यवसायाचे मुख्य मालक बेळगाव भागातील आहेत. हे धनवान बुकी कधीही कारवाईला घाबरत नाहीत. कारवाई झाली तरी ते तत्काळ जामीन मिळवून पुन्हा आपला धंदा सुरू करतात. त्यामुळे त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. या जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. काहीजण व्यसनाधीन झाले आहेत, तर काहीजण कर्जाच्या खाईत लोटले गेले आहेत. या गैरव्यवसायामुळे अनेक घरांमध्ये गरिबी आणि अशांतता पसरली आहे.