Kolhapur Crime : निलंबित प्रा. सौरभ जोशीविरोधात12 विद्यार्थिनी पोलिसांच्या संपर्कात

पाच मुलींचे जबाब : पुन्हा ताब्यात घेणार
Kolhapur Crime News
निलंबित प्रा. सौरभ जोशीविरोधात12 विद्यार्थिनी पोलिसांच्या संपर्कात
Published on
Updated on

कोल्हापूर : आभियांत्रिकी कॉलेजमधील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केलेल्या निलंबित प्राध्यापक सौरभ संजय जोशी (30, रा. बाबूजमाल दर्ग्याजवळ कोल्हापूर) याचे आणखी धक्कादायक कारनामे चव्हाट्यावर येत आहेत. प्रा. जोशीविरुद्ध 12 विद्यार्थिनींनी गंभीर तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी 5 मुलींचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन त्याला पुन्हा कळंबा कारागृहातून ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षीरसागर यांनी प्राध्यापक जोशी याच्या कारनाम्याची गंभीरपणे दखल घेण्यात आल्याचे सांगितले. जोशी याच्या कारनाम्यामुळे नाहक मन:स्ताप सोसाव्या लागलेल्या विद्यार्थिनींनी पोलिस यंत्रणेशी संपर्क साधावा, संबंधितांच्या नावाबाबत गोपनीयता पाळण्यात येईल, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

गोकुळ शिरगावच्या सहायक निरीक्षक तथा तपासाधिकारी तबस्सूम मगदूम म्हणाल्या, संशयित प्रा. सौरभ जोशी याच्याविरुद्ध गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. इतर काही मुलींच्या बाबतही त्याचे वर्तन गंभीर स्वरूपाचे आहे. संबंधित मुलींनी तक्रारीचा पाढा वाचला आहे. विद्यार्थिनींशी मोबाईलवरून बोलतानाही त्याचे लज्जास्पद वर्तन राहिले आहे. विशेष म्हणजे संशयिताने संभाषण रेकॉर्डिंग केले असावे, अशी माहिती आहे. त्याचा मोबाईल हस्तगत करून त्याचा डेटा तपासावा लागेल, असेही सहायक निरीक्षक मगदूम म्हणाल्या.

पीडित विद्यार्र्थिनीची तक्रार दाखल होताच संशयित प्रा. जोशीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यामुळे तपासावर मर्यादा आल्या आहेत. मात्र प्रा. जोशी याचा जेलमधून पुन्हा ताबा मिळण्यासाठी न्यायालयात रीतसर अर्ज दाखल करणार आहोत. ताबा मिळाल्यानंतर चौकशीची आणि गुन्ह्याची व्याप्ती लक्षात येऊ शकेल, असेही त्या म्हणाल्या.

प्रा. जोशीच्या कृत्याने शैक्षणिक क्षेत्राला काळा डाग : पवार

उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय पवार म्हणाले, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. प्रा. जोशी याच्या कृत्याने माणुसकीला काळीमा फासला गेला आहे. शिवाय शैक्षणिक क्षेत्राला या कृत्याने काळा डाग लागला आहे. संबंधित संस्थेने संशयिताला संस्थेतून तत्काळ बडतर्फ करावे, अन्यथा भविष्यात होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे, असा इशारा दिला.

दरम्यान, शैक्षक्षिक क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या कृत्याविरोधात पालकासह सामाजिक संस्था, संघटना तसेच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेमार्फत नराधम प्रा. जोशी याच्या तोंडाला डांबर फासण्याचा इशारा दिला आहे. जोशी याच्यावर येत्या काही दिवसांत बडतर्फीची कारवाई न झाल्यास संबंधित संस्थेच्या प्रवेशद्वारात व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय पवार, मंजित माने यांनी रविवारी दिला. कोणत्याही स्थितीत या प्रकरणाचा अखेरपर्यंत पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news