

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील पुष्पनगर येथे सराफी दुकान व घरफोडी करून दरोडा टाकणार्या सराईत टोळीचा भुदरगड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत छडा लावून बारा जणांना अटक केली. त्यांच्याकडून एक लाखाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.
याप्रकरणी सिकंदर गोविंद काळे, (वय 37), प्रकाश बन्सी काळे, (26), रमेश विलास शिंदे (35), आक्काबाई सिकंदर काळे (30), विलास छन्नू शिंदे (52), चंदाबाई विलास शिंदे (50, सर्व रा. इटकोर, ता. कळंब, जि. धाराशिव), शंकर पोपट शिंदे (20), राजन दत्ता शिंदे (20, रा. कोठाळवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) सोमनाथ ऊर्फ सोम्या सुंदर पवार (25, रा. वरपगाव, ता. केज, जि. बीड), मंगल रमेश शिंदे (36), राजेंद्र बप्पा पवार (65), ललिता राजेंद्र पवार (42, रा. वाकडी) यांना अटक करण्यात आली आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास पुष्पनगर येथील आशिष होगाडे यांच्या सराफी दुकानात, शेजारील बांगड्याच्या दुकानात दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र चाहूल लागल्याने तो फसला होता. यावेळी चोरट्यांनी शामराव रावजी बाबर यांच्या घरातून सुमारे एक लाख रुपयांचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले होते. या प्रकरणी भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील, शाहबाज शेख, योगेश गोरे, सहायक फौजदार महादेव मगदूम, यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सराईत गुन्हेगार...
अटक करण्यात आलेले सराईत आरोपी सिकंदर गोविंद काळेवर 31, रमेश विलास शिंदेवरवर 11, विलास छन्नू शिंदे वर 24, राजेंद्र बप्पा पवार वर 5 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.