Kolhapur Crime : बोगस डॉक्टर प्रकरण : गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारा 'MR' गजाआड; 3 दिवसांची पोलीस कोठडी

​खोतवाडी रॅकेटची पाळेमुळे कोल्हापूरपर्यंत; मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता
Kolhapur Crime : बोगस डॉक्टर प्रकरण : गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारा 'MR' गजाआड; 3 दिवसांची पोलीस कोठडी
Published on
Updated on

Kolhapur Crime Panhala bogus doctor case MR arrested

इंद्रजित शिंदे

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी (माजगाव) येथील बोगस डॉक्टर प्रकरणात आता मोठी प्रगती झाली असून, गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या सतीश दिलीप ओतारी (वय २६, रा. आयसोलेशन हॉस्पिटलजवळ, कोल्हापूर) या 'एमआर'ला पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी त्याला कळे-खेरीवडे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

गेल्या शुक्रवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा तालुका आरोग्य पथकाने संयुक्त कारवाई करून बोगस डॉक्टर ऋषिकेश रामचंद्र खोत आणि त्याचा मेडिकलवाला मित्र ऋषिकेश संजय माने या दोघांना रंगेहात पकडले होते. या दोघांच्या पोलीस कोठडीदरम्यान करण्यात आलेल्या सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. औषध विक्रेता ऋषिकेश माने याने कबुली दिली की, गर्भपातासाठी लागणाऱ्या या प्रतिबंधित गोळ्या त्याने कोल्हापुरातील सतीश ओतारी या एमआरकडून विकत घेतल्या होत्या. या माहितीच्या आधारे पन्हाळा पोलिसांनी सोमवारी कोल्हापुरातून ओतारी याला बेड्या ठोकल्या.

न्यायालयात हजर केले असता, पोलिसांनी या प्रकरणात अजून काही जणांचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. हे केवळ एका क्लिनिकपुरते मर्यादित नसून, जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्या पुरवणारे एक मोठे रॅकेट कार्यरत असण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. सतीश ओतारी याच्या अटकेमुळे या रॅकेटची पाळेमुळे नेमकी कुठे पर्यंत पसरली आहेत आणि तो अजून किती बोगस डॉक्टरांना अशा प्रकारची औषधे पुरवत होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या रॅकेटमध्ये मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता असल्याने या तपासाकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news