

शिरोली एमआयडिसी: वैयक्तिक संबंधातून शिये फाटा येथे एकावर रोखलेले पिस्तुल काही नागरिकांनी हिसकावण्याचा प्रयत्न केल्याने पिस्तुलातून 3 गोळ्या हवेत झाडल्या. यामुळे एकजण जिवघेण्या हल्ल्यातून वाचला. ही घटना फेडरल बँकेच्या दारात सायंकाळी साडेसहा वाजण्यासुमार घडली. या घटनेनंतर जमलेल्या जमावाने पिस्तूल रोखणार्या आरोपीला बेदम चोप दिला. घटनास्थळी तात्काळ शिरोली पोलिस हजर झाल्याने मोठा अनर्थ टळला.
या प्रकरणी आरोपी गणेश शेलार (वय-४५ वर्षे, रा. नागाव, ता.हातकणंगले) यास ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्यात वापरलेली पिस्तुल जप्त केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. योगेशकुमार गुप्ता, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुजितकुमार क्षिरसागर यानी ऐन गणेशोत्सव काळात घडलेल्या घटनेबाबत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घटनास्थळी भेट दिली.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाटा, टोप येथे असलेल्या फेडरल बँकेमधील एटीएममध्ये गणेश शेलार पैसे काढण्यासाठी आला होता. त्यावेळी विजय पोवार व नितीन पाटील हे दोघे तिथे आले, या तिघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. गणेश शेलार यास यांच्याकडून मारहाण होणार याची शक्यता धरून गणेश शेलार याने आपल्या ताब्यात असलेली पिस्तुल विजय पवार , नितीन पाटील यांच्यावर रोखले पोवार सोबत आलेल्या काही लोकांनी ते पिस्तूल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीमध्ये पिस्तुलातून तिन गोळ्या झाडल्या गेल्या घटनास्थळी असलेल्या लोकांनी गणेश शेलार यास बेदम मारहाण केली.
या घटनेची खबर अज्ञाताने पोलिसाना कळवल्याने पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल होत येथील जमाव पांगवला व या घटनेशी संबधित असेलेल्या गणेश शेलार , नितीन पाटील , विजय पोवार यांच्यासह काहीजणांना पोलिसानी ताब्यात घेतले. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यानी भेट दिली व प्रकरणाच्या तपासाबाबत शिरोली पोलिसाना सूचना व आदेश दिले या दरम्यान गोळीबार करणाऱ्या गणेश शेलार यास घटनास्थळी फिरवून घटनेची माहिती घेतली .
ऐन गणेशोत्सव काळामध्ये कायदा व सुव्यवस्था आबादित ठेवण्याच्या प्रयत्नात पोलिस असताना कोल्हापूर शहरापासून अवघ्या १५ किलोवर असणाऱ्या शहरालगतच्या शिये फाटा टोप येथे असलेल्या फेडरल बँकेसमोर गोळीबाराच्या घटनेने पोलिस खात्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे. गोळीबार करण्यासारखे असे कोणते कारण या घटनेमागे आहे याबाबत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. या घटनेबाबत बोलताना अप्पर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यानी वैयक्तिक अंतर्गत संबंधातून ही घटना घडली.
स्वतःच्या सुरक्षिततेसाठी परवाना घेवून घेतलेले पिस्तुल किंवा कोणतेही हत्यार अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी उघडपणे आणून त्यातून गोळीबार करणे हा गुन्हा आहे. या प्रकरणात आरोपीने आपल्या ताब्यातील पिस्तुलमधून तीन फायरिंग झाडल्या आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही किंवा कोणीही गंभीर स्वरूपात जखमी झालेले नाही . मात्र या गुन्ह्याची गंभीर दखल घेत संबंधितावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे त्यानी सांगितले. या घटनेने शिरोली परिसर खळबळ माजली आहे.