

कवठेगुलंद : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील कवठेगुलंदसह सात गावांच्या परिसरात सध्या अवैध धंद्यांनी अक्षरशः सुळसुळाट केला आहे. गांजाची उघड विक्री आणि मटक्याचे फोफावलेले जाळे यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, दिवसाढवळ्या हे व्यवहार सुरू असतानाही पोलीस प्रशासन सुस्त असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे.
या गावांत गुन्हेगारीचे पेव
बूबनाळ, गणेशवाडी, गौरवाड, औरवाड आणि शेडशाळ यांसारख्या सीमावर्ती गावांमध्ये गांजा आणि मटका अड्ड्यांनी पाय घट्ट रोवले आहेत. कर्नाटक सीमेलगतचा फायदा घेत गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत आहे. या अवैध व्यवसायांमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडले असून, शाळकरी मुले आणि तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या उंबरठ्यावर उभी आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांच्या 'गस्ती'वर प्रश्नचिन्ह
स्थानिक नागरिकांच्या मते, काही ठिकाणी हे व्यवहार सर्वांच्या समोर सुरू असतात. मात्र, पोलिसांच्या गस्तीचा पत्ता नसतो. सीमाभागातील दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळाले असून, कायद्याचा धाक पूर्णपणे संपल्याचे चित्र दिसत आहे.
संयुक्त कारवाईची मागणी
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्र आणि कर्नाटक पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने छापेमारी करून हे अड्डे उद्ध्वस्त करावेत, अन्यथा संतप्त नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
लक्षवेधी मागण्या
सीमाभागात दोन्ही राज्यांच्या पोलिसांची संयुक्त गस्त सुरू करावी
गांजा विक्रेते आणि मटका चालकांवर मोक्कासारखी कठोर कारवाई व्हावी
ग्रामीण भागात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवण्यात यावी
शाळा-महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील पोलिसांची नेमणूक करावी.