

दिलीप भिसे
कोल्हापूर : घातक शस्त्रांच्या धाकावर गुंडागर्दी करीत छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर दहशत माजविणाऱ्या खंडणीखोरांनी शहर, जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. 25 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून दानोळीतील व्यापाऱ्याची अमानुष हत्या झाली. 40 हजारांच्या खंडणीसाठी इचलकरंजी, मंगळवार पेठ परिसरात भरचौकात कोयते नाचवत गुंड टोळीने हंगामा घातला. 2024-25 मध्ये खंडणी वसुलीप्रकरणी जिल्ह्यात पंधरांवर गुन्ह्यांची नोंद होऊनही खंडणीखोर फुकटच्या मिळकतीला सोकावले आहेत.
दानोळी (ता. शिरोळ) येथील व्यापारी भरतेश टोपगोंडा (वय 40) यांचे संशयित राजदीप ताडे, टिल्लू ऊर्फ मंथन पवार यांनी अपहरण केले. 25 लाखांच्या खंडणीसाठी विजेचा शॉक देऊन व्यापाऱ्याचा जीव घेतला. अंगावर शहारे आणणारी घटना वास्तविक टोपगोंडा यांच्या कुटुंबीयांनी तत्काळ जयसिंगपूर पोलिस ठाण्यांशी संपर्क साधून खंडणीखोरांच्या कृत्याची माहिती दिली होती. पोलिसांनी वेळीच शोधमोहीम राबविली असती, तर टोपगोंडा यांचा जीव वाचला असता; पण प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे एका व्यापाऱ्याला जीवाला मुकावे लागले आहे. इचलकरंजीत गुंड साथीदारांच्या खर्चासाठी सराईत टोळीने थरार माजविला. शिवराज माने यांच्याकडे 40 हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. त्यांनी नकार देताच त्यांच्या घरावर सशस्त्र हल्ला झाला. दि.13 एप्रिलला रात्री हा प्रकार घडला. टोळीची धिंड काढण्यात आली. गुंडाची दहशत जुजबी कारवाईने थांबणार नाही. इचलकरंजी, शहापूर परिसरात खंडणीखोरांनी धुमाकूळ घातला आहे. गावभाग, शिवाजीनगर, शहापूर, जयसिंगपूर पोलिस ठाण्यात 15 गुन्हे दाखल होऊनही खंडणीखोरांचे कारनामे थांबलेले नाहीत.
गृह खात्याबाबत चिडीचूप
लक्ष्मीपुरीत विक्रेत्याला धमकी देऊन 5 लाखाच्या खंडणीची मागणी झाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला रस्त्यात अडवून त्याच्याकडे 50 हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. एव्हाना खंडणीप्रकरणी इस्पुर्ली पोलिस ठाण्यातील सहायक फौजदारासह तिघांवर गुन्हा दाखल झाला. शहर, जिल्ह्यात खंडणीखोरांचे गंभीर कारनामे वाढत असतानाही जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी गृह खात्याला जाब विचारत नाहीत, हे विशेष!
पोलिसांचा तपास संशोधनाचा विषय
अनैतिक संबंधाची धमकी देत तारदाळ (ता. हातकणंगले) येथील एका व्यावसायिकाकडून टोळीने 3 कोटींच्या खंडणीची मागणी केली. जून 2025 मध्ये महिलेसह 5 जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी काय तपास केला, हा संशोधनाचा विषय आहे.