

कोल्हापूर : चारचाकी, दुचाकींसह घरफोडी आणि चोरीच्या 120 पेक्षा जादा गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेला सराईत गुन्हेगार नागेश हणमंत शिंदे ( वय 30, रा. कोरोची, ता. हातकणंगले) याच्याकडून महागड्या आणि कंडिशनर मोटारी पंधरा-वीस हजारांत खरेदी करणार्यांनाही सहआरोपी करण्याचा निर्धार वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी घेतला आहे.
सराईत गुन्हेगार नागेश शिंदे याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यात साथीदारांचाही सहभाग असावा, असा संशय असल्याचे तपासाधिकारी तथा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. चौकशीत मित्रांची नावे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
संशयिताला जानेवारी 2025 मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक करून त्याच्याकडून दुचाकी, चारचाकीसह चोरी, घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीला आणले होते. नागेश शिंदे सराईत गुन्हेगार आहे, याची माहिती असताना महागड्या, कंडिशनर मोटारी 20 हजारांपासून 50 हजारात कागदपत्रांशिवाय खरेदी घेणार्या 5 जणांना सहआरोपी करून चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, असेही कळमकर यांनी सांगितले.
चोरीच्या गुन्ह्यात जामिनावर सुटका होताच कोल्हापूर, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात चोरीचे गुन्हे करणार्या संशयिताला अटक करून त्याच्याकडून 8 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत त्याने 3 गुन्ह्यांची कबुली दिली असली तरी शहर, ग्रामीण भागातील अनेक गुन्ह्यात त्याचा सहभाग असावा, असा संशय आहे. त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात येत आहे. चोरीच्या गुन्ह्यातील वाहनांसह अन्य किमती, महागड्या वस्तू स्वस्तात विकत घेणार्यांनाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.