Kolhapur Fraud : कर्जाच्या आमिषाने ४२ लाखांची फसवणूक

सोशल मीडियावरील जाहिरातीने घातला गंडा
fraud
fraud (Pudhari File Photo)
Published on
Updated on

कोल्हापूर : व्यवसायासाठी २ कोटी रुपयांचे कर्ज देण्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ४२ लाख २९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. सप्टेंबर २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२६ दरम्यान ही घटना घडली. याबाबतची फिर्याद जोतिबा पाटील (वय ६५, रा. सर्किट हाऊस समोर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

जोतिबा पाटील यांच्या मुलांचा व्यवसाय उभा करण्यासाठी २ कोटी रुपयांच्या कर्जाची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर काही जाहिराती पाहून सप्टेंबर २०२५ मध्ये यातील नंबरवर संपर्क केला. संशयितांनी पाटील यांना तुमचे कर्ज मंजूर होईल; मात्र त्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करून बँक खात्यांची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानुसार पाटील यांनी कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाठवून सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली.

फॉरेन फंडच्या नावावर गंडा

संशयितांनी ११ नंबरवरून पाटील यांना संपर्क केला. त्यांनी कर्जाची मंजूर झालेली रक्कम परदेशातून येणार असल्याचे सांगितले. यासाठी जीएसटी तपासणी, इन्कम टॅक्स, आरबीआय कडून फॉरेन फंड तपासणीसाठी काही रक्कम वर्ग करायची असल्याचे सांगून पाटील यांना गंडा घातला.

१७५० रुपयांत कर्ज

पाटील सोशल मीडियावर कर्जाच्या जाहिराती बघत असताना त्यांना १,७५० रुपयांत बिनव्याजी कर्ज अशी जाहिरात दिसली. त्यांनी तत्काळ या जाहिरातीचा आधार घेऊन संपर्क केला. यानंतरच त्यांची ४२ लाखांची फसवणूक झाली.

वेळोवेळी रक्कम वर्ग

संशयितांनी पाटील यांच्याकडून विविध ५ ते ६ खात्यांवर पैसे वर्ग करून घेतले आहेत. विविध ११ नंबरवरून वेगवेगळ्या नावाने संपर्क करून, अधिकारी असल्याचे सांगून ही रक्कम वर्ग केली आहे. गेल्या वर्षभरात साधारणपणे १० वेळा त्यांनी ही रक्कम भरली आहे.

अखेर तक्रार दाखल

पाटील यांना संशयितांनी गेल्या वर्षभराच्या काळात काही ठरावीक अंतराने फोन केले. यानंतर त्यांच्याकडून रक्कम वर्ग होईपर्यंत संपर्क सुरू ठेवला. आठ दिवसांपूर्वी पाटील यांनी कर्जाबाबत पुढे काय झाले, याची विचारणा करण्यासाठी फोन केला असता सर्वच नंबर बंद लागल्यामुळे त्यांना संशय आला. यानंतर त्यांनी याबाबतची रितसर तक्रार दाखल केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news