कोल्हापूर : राजारामपुरी येथील खासगी फर्ममध्ये काम करणार्या युवतीचा सतत पाठलाग करून छेडछाड करणार्या तरुणाची संतप्त जमावाने शुक्रवारी सकाळी धुलाई केली. प्रमोद हरिदास महाडिक ( वय 30, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. राजारामपुरी पोलिसांनी त्यास अटक केली.
पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले की, करवीर तालुक्यातील 23 वर्षीय युवती राजारामपुरी येथील खासगी फर्ममध्ये कामाला आहे. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी सहावी गल्ली येथे रोज सकाळी ती चालत जाते. 20 दिवसांपूर्वी प्रमोद याने युवतीचा पाठलाग केला. ‘शूकशूक’ असा आवाज करून तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. ‘थांब, माझे काम आहे’ असे तो बरळू लागला. युवतीने त्याच्या कृत्याकडे दुर्लक्ष केले. दि. 28 व 29 ऑगस्ट रोजी सकाळी तरुणाने पुन्हा युवतीचा पाठलाग केला. या घटनेमुळे त्रस्त झालेल्या युवतीने नातेवाईकांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे युवती कामासाठी जात असताना प्रमोद याने पुन्हा दुचाकीवरून तिचा पाठलाग केला.
राजारामपुरी येथील जनता बझार चौकाजवळ त्याने पुन्हा तिला रोखण्याचा प्रयत्न केला. युवतीने त्यास जाब विचारण्याचा प्रयत्न करताच नातेवाईक, नागरिकांनी गर्दी केली. संतप्त जमावाने जाब विचारत त्याची धुलाई करून त्यास राजारामपुरी पोलिसांच्या स्वाधीन केले. छेडछाडीच्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जमावाने या तरुणाला मारहाण केल्याचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी सांगितले. शनिवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.