

जयसिंगपूर : गोठ्याकडे दूध काढायला गेलेल्या 20 मिनिटाच्या मुदतीत चुलत पुतणीने काकाच्या घरात चोरी करून 6 लाख 20 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उदगाव (ता.शिरोळ) येथील नागोबा मंदिरजवळ असलेल्या श्रीकांत तातोबा चिवटे यांच्या घरी गुरुवारी सकाळी 8 च्या सुमारास घडली. जयसिंगपूर पोलिसांनी अवघ्या २ तासात या चोरीचा छडा लावत चुलत पुतणी रुपाली संजय संकपाळ (वय 43, रा.उदगाव) हिला मुद्देमालासह अटक केली आहे. दरम्यान आईच्या दवाखान्याचे बिल भागविण्यासाठी रुपाली संपकाळ हिने चोरी केल्याचे सांगितले आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास वैशाली चिवटे या गोठ्याकडे दूध काढायला गेल्या होत्या. या 20 मिनिटाच्या मुदतीत घराच्या देवळीतील किल्ली घेऊन कुलूप काडून घरात प्रवेश करून कपाटातील सव्वातीन तोळ्याचे गंठण, 1 तोळ्याचा नेकलेस, दीड तोळ्याच्या 2 चेन, पावनेदोन तोळ्याच्या ३ अंगठ्या, अर्धा तोळ्याच्या रिंगा व २ ग्रॅमचे कानातले टोप्स असा 60 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा असा एकूण 6 लाख 20 हजार किंमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याची घटना घडली.
घटनेनंतर जयसिंगपूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस अमलदार जावेद आंबेकरी यांना ही चोरी रुपाली संजय संकपाळ हिने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 2 तासात या चोरीचा छडा लावत रुपाली संकपाळ हिला ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी चोरीचे सोने बँकेत ठेवून कर्ज काढून दवाखान्यात उपचार घेत असलेल्या आईच्या दवाखान्याचे बिल भागविण्यासाठी 60 ग्रॅम वजनाचे दागिने चोरी करून घरात लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलिसांनी हे दागिने हस्तगत करून तिला अटक केली आहे. या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक संतोष गोरे, पोलीस उपनिरीक्षक युनूस जमादार, पो.ना.ताहिर मुल्ला, पो.कॉ.जावेद आंबेकरी, रहिमान शेख, शुभम घाटगे यांच्यासह पोलीस पथकाचा समावेश होता.