राशिवडे : लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणूक करून २०२१ पासून तब्बल पाच वर्षे पसार असलेल्या दोन संशयितांना राधानगरी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून जेरबंद केले. त्यांच्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
राधानगरी पोलिस ठाण्यात चेतन प्रल्हाद गायकवाड (३५) व पंकज श्रावण भालेराव (२८, दोघेही रा. सोलापूर) यांच्याविरोधात २०२१ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राचा विवाह जुळवून आणताना संबंधित महिलांचे यापूर्वीच विवाह झाल्याची माहिती लपवून ठेवली. तसेच, लग्न जुळवून देण्याच्या मोबदल्यात रोख रक्कम व वधूच्या अंगावरील दागिने असे मिळून फिर्यादी यांची दोन लाख १० हजार रुपये आणि त्यांचे मित्र श्रीकांत जाधव यांची एक लाख ८० हजार रुपये, अशी ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली होती.