

चंदगड : कानूर खुर्द येथे १६ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर १० जणांची वन्य प्राणी शिकाऱ्यांची जबरी टोळी व चंदगड वनपरिक्षेत्राचे गस्तीपथक यांच्यात धूमचक्री झाली होती. या टोळी मधील आठ जणांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, आता या टोळीचा म्होरक्या व नववा संशयित आरोपी शबगीर दस्तगीर जमादार (रा. दानोळी, ता हातकलंगले ) हा फरार होता. त्याला चंदगड वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याला गुरुवार (दि. 14) पर्यंत वनकोठडी मिळाली आहे. यापैकी लखन हेगडे (रा. माणगाववाडी, ता. हातकणंगले) हा शेवटचा दहावा आरोपी अद्याप फरार आहे.
या टोळीचा मुख्य सूत्रधार व म्होरक्या शबगीर याचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर त्याने स्वतः चंदगड वन कार्यालयात हजर राहून अटक करवून घेतली. सदर गुन्ह्यामध्ये यापूर्वी अटक करण्यात आलेले ८ आरोपी सध्या जामिनावर आहेत. तुकाराम अमृसकर, (रा. कानूर खुर्द, चंदगड), रियाज जमादार, (रा. दानोळी), अमीन मुजावर, (रा. रुकडी), दिगंबर अनगुडे (रा. कानूर खुर्द, चंदगड) इर्शाद नदाफ, दाऊद नदाफ, अन्वर पटेल, यासिन उर्फ बबलू नदाफ, ( चौघेही रा. दानोळी) यांचा समावेश आहे.
आरोपी शबगीर याने प्रथम गडहिंग्लज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोल्हापूर खंडपीठाने त्याचा जामीन नाकारला. अधिक तपास उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी म्हणून चंदगडचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड, कानूर खुर्द चे वनपाल चंद्रकांत पावसकर काम पाहत आहेत.
अत्याधुनिक हत्यारे व मोबाईल जप्त
मुख्य संशयित शबगीर हा हा धूमचक्री झाली, त्या घटनास्थळी एका आलिशान कार मध्ये होता. त्या कारमधून अत्याधुनिक धारदार हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्याचा मोबाईल सीडीआर, तांत्रिक पुरावे व इतर महत्त्वाचे मोबाईल्स रेकॉर्ड अधिकाऱ्यानी ताब्यात घेतले आहे. आणखी शेवटचा आरोपी लखन हेगडे यालाही येत्या काही दिवसात अटक करू, असे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड व वनपाल कृष्णा डेळेकर यांनी सांगितले.