

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) येथील खुनासह गर्दी, मारामारी, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या सराईत गुंडाच्या शाहूपुरी पोलिसांनी गुरुवारी मुसक्या आवळल्या. संशयिताकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले. राकेश किरण कारंडे ( वय 35, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे.
शहरातील गुन्हेगारी टोळीतील एका गुंडाकडून सहा महिन्यांपूर्वी संशयिताने पिस्तूल, काडतुसे खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. गुंडाकडून खरेदी केलेले पिस्तूल विक्रीसाठी संशयित मार्केट यार्ड परिसरात लोणार वसाहतकडे जाणाऱ्या रामकृष्ण हॉलजवळ थांबला असताना गुन्हे प्रगटीकरण पथकाने छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
संशयिताची पथकाने झडती घेतली. कब्जात गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आल्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. संशयिताविरुध्द गांधीनगर पोलिस ठाण्यांकडे दोन, राजारामपुरी पोलिस ठाण्यात दोन गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. गुंडाकडून खरेदी केलेल्या पिस्तूलाची विक्री करण्यासाठी संशयित काही दिवसांपासून हत्यारासह शहर, उपनगरात वावरत होता.
शाहूपुरी पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हे प्रगटीकरण पथकाला संशयिताची माहिती मिळताच दोन दिवसांपासून पोलिस मागावर होते. सहा महिन्यांच्या काळात संशयिताने पिस्तूलच्या धाकावर कोणाची लूबाडणूक केली असावी का, याचा शोध घेण्यात येत आहे. शिवाय संशयिताला पिस्तूल पुरविणाऱ्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात येणार आहे, असेही तपासाधिकारी डोके यांनी सांगितले. न्यायालयाने त्यास शनिवारी (दि.21) पर्यंत पोलिस कोठडी बजावली.